Bookstruck

धडपडणारी मुले 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“मला आतां जग स्वामी या नांवानेच हांक मारतें. तसें पाहिलें तर मी स्वामी कशाचाच नाही. ना जगाचा, ना स्वत:चा. मी नाममात्र स्वामी आहे,” स्वामी हसत म्हणाले.

“तुम्ही कायमचें कोठें नाही का राहात?”

“एके काळीं तसा राहाण्याचा प्रयत्न केला, परंतु मला समाधान होईना. मी मेघासारखा स्वैरसंचार करीत असतों,” स्वामी म्हणाले

“मेघाप्रमाणें वर्षाव करता, कोरडी जीवनें ओलीं करता, संदेशाची गर्जना करता.”

“कोरडी गर्जना करणारेहि मेघ असतात,” स्वामी म्हणालें.

“परंतु त्यांचें स्वरुप एकदम कळतें. ते लपत नाहीं. तुमचे कालचें भाषण आम्हा सर्वांना आवडले.”

“छट् तें आवडणें शक्य नाही. उगीच खोटे सांगू नका,” स्वामी म्हणाले.

“खरोखरच तुमचे विचार मला आवडले. माझ्या हृदयांत तेच विचार आहेत. ते बोलून दाखविण्याचे धैर्य व सामर्थ्य माझ्याजवळ नाही.”

“काय, तुमचेहि विचार असे आहेत? ते विचार स्वाभिमानहीनतेचे तुम्हास नाही वाटत? महाराष्ट्राचा अपमान करणारे आहेत असें नाही वाटत?” स्वामींनीं विचारलें.

“नाही. महाराष्ट्र तीन शतकें मागें यावा असें मला वाटत नाही. प्राचीन इतिहासांतील स्फूर्ति व त्याग घेऊन आजच्या नवीन ध्येयांना आपण कवटाळलें पाहिजे.”

“तुमचे नांव काय?” स्वामींनीं विचारले.

“गोपाळराव,” ते गृहस्थ म्हणाले.

“तुम्ही काय करता?” स्वामींनी विचारलें.

“मी येथे एका छात्रालय चालविले आहे,” गोपाळराव म्हणाले.

“शाळेला जोडून आहे की स्वतंत्र आहे?”

“स्वतंत्र आहे.”

“किती आहेत मुलें?”

“दीडशें मुलें आहेत!” गोपाळराव जरा अभिमानानें म्हणाले.

“तुमचे छात्रालय विशिष्ट जातीसाठी आहे की काय?”

« PreviousChapter ListNext »