Bookstruck

धडपडणारी मुले 25

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

एके दिवशीं सायंकाळी स्वामी खणती घेऊन खणूं लागले. स्वामी खणीत आहेत हें पाहून तो पाहा नामदेव आला, दयाराम आला, रघुनाथ आला.

“काय करायचें येथे?” नामदेवानें विचारले.

“आपण येथे बाग करु या. ओसाड जागेला हसवू,” स्वामी म्हणाले.

“परंतु पाणी कोण घालील?” दयारामनें विचारलें,

“ज्याला फुलांची आवड असेल तो,” स्वामी म्हणाले.

“स्टोअरमधून मी आणखी दोन कुदळ घेऊन येतो,” रघुनाथ म्हणाला.

“जा घेऊन ये,’ नामदेव म्हणाला.

ती जागा साफसूफ झाली. तेथले दगड, खडे बाजूला करण्यांत आले काही मुलें तेथे रोज काम करू लागली. स्वामीहि त्यांच्याबरोबर असत.  विटांचे तुकडे लावून सुंदर रचना करण्यांत आली. फूलझाडांची कलमें लावण्यात आली. कांही लौकर उगवणा-या फूलझाडांचें बीं पेरण्यांत आलें. गुलाब, निशिगंध, शेवती, मोगरे तेथे लावण्यांत आले. गुलबक्षी लावण्यांत आल्या. कर्दळी लावण्यांत आल्या. पुन्नाग व अशोक यांची दोन झाडें नामदेवानें आपल्या हातानें लाविली. रघुनाथनें खूप तुळशी लाविल्या. कमानीवर चित्रांगंची वेल सोडण्यांत आली. रातराणी दयारामानें आणून लाविली. नाना फूलझाडे तेथे लावण्यांत आली. सकाळसायंकाळ मुलें पाणी घालीत. तेरडे लौकर फुलू लागले. इतरहि कांही फूलझाडांना भराभरा फुलें आली ती ओसाड जमीन रमणीय दिसू लागली.

स्वामी उजाडले म्हणजे बागेत जात. रघुनाथ, नामदेव, तेहि बागेंत येत. नवी कळी कोठें येत आहे, ती कधी फुलेल याचें निरीक्षण करण्यांत येई. “गुलाबाला अजून का बरें की येत नाही,” रघुनाथनें विचारलें.

“येईल. त्याला पानें बघ कशी फुटली आहेत,” स्वामी म्हणाले.

“गुलाबाचें पहिलें फुल फुललें म्हणजे आपण बागेंत समारंभ करुं,” नामदेव म्हणाला.

“समारंभ करावयाचा म्हणजे काय करावयाचे?” रघुनाथनें विचारलें.

“सारीं मुलें येथे जमूं. स्वामीजी कांही सांगतील. मी बांसरी वाजवीन,” नामदेव म्हणाला.

“करूं, समारंभ करुं,” स्वामी म्हणाले.

गुलाबाला कळी आली कीं नाही तें रघुनाथ रोज पाहावयाचा. ‘अजून नाहीं कळी येत; केव्हां येईल? असें मनांत म्हणावयाचा. परंतु एक दिवस हिरवा परकर नेसलेली लहानशी कळी आली! रघुनाथनें हर्षाची टाळी पिटली.

« PreviousChapter ListNext »