Bookstruck

धडपडणारी मुले 29

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

‘रघुनाथ! हीं बघ तुझीं तीन भावंडे. यांना खायला नाही रे मला देता येते. तुला ते पैसे पाठवितात, पण आमचे हाल करतात रे. त्या रांडेच्या घरी सारें नेऊन भरतात. मला दाणेहि नाही रे घरांत ठेवीत. रघुनाथ! मोठा हो व या भावंडांना वाढव. मोठा हो व आईचे अश्रू पूस. तुझी मला आशा, तुझा विसांवा’, असें आई म्हणत होती.

‘रघुनाथ ! हीं पहा कोट्यवधि तुझीं भावंडे ! हे पाहा कारखान्यांतील पिळवटून जाणारे, चिपाडाप्रमाणें होणारे तुझे लाखो भाऊ! हे पाहा सावकारी पाशांत जखडून गेलेले तुझे शेतकरी बंधु! नवरा दारूबाज झाल्यामुळें ही पाहा लाखो पत्नींच्या अश्रूंची वाहाणारी कढत कढत अश्रूंची महागंगा! सनातनी दगडांच्या जाचामुळें त्रस्त झालेली ही पाहा अस्पृश्य जनता! हे पाहा हिंदुमुसलमानांतील मारामारीचे माझ्या अंगावर उडणारे रक्ताचे थेंब ! या पाहा परकी सरकारनें चालविलेल्या पिळणुकी व या धगधगीत जालियानवाला बागा! रघुनाथ ! एका साडेतीन हातांच्या आईकडं नको बघूं. मी मातांची माता आहे. मला मुक्त कर म्हणजे इतर कोट्यवधि माता आपोआप मुक्त होतील. माझे अश्रू पूस म्हणजे त्यांचे पुसले जातील. मोठ्यांत छोटें येऊन जातें, रघुनाथ! तुम्हां मुलांकडे मी आशेनें बघत आहे. इतर भूमाता माझ्यासारख्या अभागी नाहीत. जपान भूमातेसाठी लाखो मरावयास उठतात! फ्रान्स, जर्मनी, रशिया, इंग्लंड, तुर्कस्थान या सा-या भूमाता सत्पुत्रवती आहेत.  आणि मी? पस्तीस कोटी माझी लेंकरें. तरीहि माझी कुतरओढ व्हावी का? या जगांत ज्ञानानें, भक्तीनें, धनधान्यानें पूर्वी मिरविलें. ध्येयवादानें, सत्यानें, सत्वाने शोभलें. परंतु आज मात्र सा-या जगांत मजहून तुच्छ दुसरें कोणी नाही. मी रडू नको तर काय करुं? रघुनाथ, या, सारे या, माझे अश्रू पुसून मला हंसवा.’

भारतमातेचे शब्द रघुनाथाच्या हृदयांत शिरत होते.

ही माता कां ती माता?

जन्मदात्री माता कां अन्नदात्री माता?

क्षणभंगुर माता कां अनाद्यनंत भारतमाता?

निश्चय होईना. रघुनाथ केविलवाणें तोंड करुन बसला होता.

“रघुनाथ! अजून तू जागा?” स्वामींनीं विचारलें.

“मी विचारांत होतों,” रघुनाथ म्हणाला.

“फार विचार करणें बरें नाही. थोडी ती गोडी जीवनाला फार खणीत नको बसू. जा आता नीज,” असे म्हणून स्वामी गेले.
रघुनाथ अंथरूण घेऊन वरतीच आला. तेथेंच गच्चीत त्यानें अंथरुण घातलें. अंथरुणावर तो पडला. आकाशांतले तारे त्याला दिसत होते. त्याला स्वामींचें वचन आठवले.

‘दिवसां आपण पृथ्वीवर सत्कर्मांची फुलें फुलवावी, रात्री देवाची फुलें फुललेली बघावी.’

खूप जोराचा वारा सुटला. चोहोंबाजूनी वारे येऊ लागले. त्या रघुनाथाला दशदिशांतून येऊन वार कुरवाळीत होते; त्याला गाणी म्हणत होते; ते वारे भारतवर्षांची सर्व कहाणी त्याला सांगत होते. बंगालमधील हजारों कुटुंबातील अश्रूंच्या कथा, वियोगांच्या कहाण्या ते अश्रू सांगत होते. मद्रासप्रांतांत मिठासाठी समुद्रकिना-यावर जाऊन लोक जमीन कशी चाटतात तें ते वारे सांगत होते. पिण्याला पाणीहि संस्थानांतून मिळत नाही, अब्रूची सुरक्षितता नाही असें संस्थांनी वारे सांगत होते.

« PreviousChapter ListNext »