Bookstruck

धडपडणारी मुले 36

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

स्वामी असें बोलत होते. आजूबाजूला मुलें जमली. नामदेवानें हळूच स्वामीच्या हातून केरसुणी घेतली होती.

“कोठें आहे केरसुणी?” त्यांनी विचारले.

“मी केर काढतो,” नामदेव म्हणाला.

“आम्ही काढू?” खोलींतील मुलें म्हणाली.

“मीच काढतो,” यशवंत म्हणाला.

“शाबास, यशवंत! खरा माणूस हो,” स्वामी म्हणाले.

एके दिवशी एका मुलाच्या खोलीत स्वामी बसले होते. तो मुलगा गांवाहून आला होता.

“फराळाचा काढ डबा; आपण सारे मिळून खाऊ,” स्वामी म्हणाले. त्या मुलांनें डबा काढला. खोलींतील सारी मुलें आली.
“त्या यशवंतालाहि बोलवा जा,” स्वामी म्हणाले. यशवंता आला.

“ये, यशवंता, खायला ये. आपण सर्व मिळून खाऊ,” स्वामी म्हणाले.

“माझ्याजवळ आहे,” यशवंत म्हणाला.

“तू तुझ्या खोलींतील मुलांना नाही का देत?” स्वामींनी विचारलें.

“नाही,” यशवंत म्हणाला.

“तू त्या सर्वांच्या देखत खातोस का?”

“नाही. मी एकटाच असतो, तेव्हांच खातो,” यशवंत म्हणाला.

“का बरें?”

“सर्वांच्या देखत एकट्याने खाणें बरें नाही.”

“आपल्या खोलींतील सारे दूर गेले असतां आपण हळूच चोरासारखें खाणे हें बरें का? आपले मन संगले की हे बरोबर नाही. यशवंत! आतां आपणा सारी एक घराची मुलें. या छात्रालयात आपण सारे एकमेकांचे भाऊ. जवळ खाऊ असेल तो सारे मिळून खाऊ. एकानें दहा दिवस आनंदांत राहावयाचें व बाकीच्यांनी दहा दिवस दु:खी असावयाचे; यापेक्षा सारे एक दिवस आनंदांत राहू या. जाईल दिवस तो सर्वांचा सुखाचा जावो,” स्वामी म्हणाले.

“मी आणू माझे लाडू?” यशवंतानें विचारलें.

“आता नको, उद्यां तुझ्या खोलींत कार्यक्रम करु,” स्वामी म्हणाले.

« PreviousChapter ListNext »