Bookstruck

धडपडणारी मुले 72

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

तो एकविसावा दिवस होता. आजची रात्र संभाळली पाहिजे असें डॉक्टर म्हणाले, स्वामींच्या दोहोंबाजूस नामदेव व रघुनाथ बसले होते.

‘नामदेव, रघुनाथ! सेवेच्या शपथा घ्या. तरच मी जगेन. काय? नाही घेववत शपथा? घऱचे मोह नाहीं सोडवत, नाही मोडवत? मग मी कशाला जगू? तुम्ही तर माझे प्राण. तुम्ही माझ्याबरोबर येणार नसाल तर कशाला मी जगू?’

स्वामींचे शब्द त्या दोघां तरुणांच्या हृदयांना विरघळवीत होते. त्यांनी एकमेकांकडे पाहिलें. दोघांनी  परस्परांचे हात हातांत घेतले. स्वामींच्या खालीवर होणा-या छातीवर ते हात त्यांनी ठेविलें. नामदेव व रघुनाथ यांनी स्वामीच्या हृदयाला साक्षी ठेवून सेवेला जीवनें देण्याचा संकल्प सोडला. त्या मध्यरात्री त्या संकल्पाचा त्यांनी उच्चार केला, ‘देवा! आमची जीवनें आम्ही सेवेस देऊं” आमचे स्वामी आम्हांस दे. आमचे प्राण ते व त्यांचे आम्ही प्राण!’

पहाटेंची वेळ होती आली. स्वामींच्या अंगाला एकदम घाम सुटला. ताप उतरणार! परंतु ताप फारच कमी झाला तर? तरीहि थंडगारच होणार! नामदेव व रघुनाथ घाबरले. गोपाळराव उठले. गोदूताईंनी कौलावर सुंठ घासन दिली. ती सुठं अंगाला, पायाला चोळण्यांत येत होती. पुन्हा पुन्हा घाम येत होता. घाम पुसून सुंठ लावण्यांत येत होती. स्वामींना शतपाझर फुटले होते. जणु हिमालय झिरपत होता. त्या तरुणांच्या निशश्चयानें स्वामीजीं पाझरले. त्यांचा ताप हटला. संताप संपला.

थोडी गरम गरम कॉफी स्वामींस देण्यांत आली. स्वामीजी शांत पडून राहिले. इतक्यांत छात्रालयाचें प्रार्थनेचें बिगुल वाजलें. स्वामीजी एकदम उठलेव म्हणाले, “प्रार्थना!”
“पडून राहा हां. उठायचे नाही,” नामदेव म्हणाला.
“परंतु तुम्ही प्रार्थनेला जा,” स्वामी म्हणाले.
स्वामी शुद्धीवर आले. ताप मर्यादित झाला. नामदेव व रघुना४थ ओथंबलेल्या हृदयाने प्रार्थनामंदिरांत गेले. नामदेवानें आज प्रार्थना सांगितली.
“हे जगत्राता विश्वविधाता हे सुखशांतिनिकेतन हे ||”
हें पद नामदेव म्हणाला. प्रार्थना संपल्यावर नामदेव मुलांना म्हणाला, “स्वामीजी शुद्धीवर आले आहेत,”
स्वामीजी बरें होऊं लागले. हळूहळू ताप थांबला. त्यांना फार अशक्यता आली होती. हिंडण्याफिरण्याची उठण्याबसण्याची अद्याप परवानगी नव्हती. ते चालताना थरथरत. नामदेव व रघुनाथ त्यांना हात धरुन चालवीत.
‘जेथें जातों तेथें तू माझा सांगती |
चालविशी हातीं धरुनिया || ” हा अभंग स्वामीजी हसत हसत म्हणत व नामदेव, रघुनाथ लाजत, सायंकाळी शाळा सुटली म्हणजे दोघे मित्र स्वामींजवळ येऊन बसत.

« PreviousChapter ListNext »