Bookstruck

धडपडणारी मुले 76

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

देवपूर

नामदेव व रघुनाथ मॅट्रिकच्या परिक्षेसाठी जाणार होते. परीक्षा झाल्यावर नामदेव आपल्या गांवी गेला असता, रघुनाथ आपल्या गांवी गेला असता. ते पुन्हां केव्हा एकत्र येणार, केव्हा भेटणार?

“नामदेव, माझ्या घरी येतोस? आपण दोघें जाऊं, एक दिवस राहू व येथे परत येऊं. तू माझी आई पाहाशील, माझी भावंडे पाहाशील. येशील का?” रघुनाथनें एक दिवशी विचारलें.

“जाऊ, स्वामीनाहि आपण बरोबर घेऊ. त्यांना विचारिलें तर ते आनंदानें येतील. विचारायचे का त्यांना?” नामदेवानें विचारलें

“स्वामींना चालण्याचा येणार नाहीत,” रघुनाथ म्हणाला.

“चार कोस तर आहे. येतील स्वामी चालत. आपण बरोबर असले म्हणजे त्यांना त्रास होणार नाही. वासराबरोबर चालताना गाय थकणार नाही व गायींबरोबर चालताना वासरु थकणार नाही,” नामदेव म्हणाला.

“चल, त्यांना विचारु,” रघुनाथ म्हणाला.

दोघे मित्र स्वामींच्या खोलीत गेले.

“काय पाहिजे नामदेव? आतां तुम्ही लौकरच जाणार. उडून जाणार.
जुने जाणार, नवे येणार, छात्रालय सदैव आहेच. जुनें पाणी जातें, नवीन येतें – प्रवाह आहे तो आहे. माणसें जन्मतात, मरतात. समाज अमर आहे. कांहीतरी अक्षय व अमर आहेच आहे. नाही का?” स्वामी म्हणाले.

“आम्ही कोठेंहि गेलों तरी तुम्हाला विसरणार नाही. मनांत तुम्ही जवळच आहात,” नामदेव म्हणाला.

“आम्ही तुमच्या कामाला येऊन मिळू. आपण एकत्रच राहू,” रघुनाथ म्हणाला.

“अभ्यास कसा काय आहे? नामदेव, आतां लक्ष लागतें का अभ्यासांत? एक एकाग्र होतें का? एकाग्रता ही मुख्य वस्तु आहे. सर्व सिद्धीची किल्ली एकाग्रतेंत आहे. आपल्या प्राचीन शिक्षणपद्धतींत एकाग्रतेवर भर असे. हिंदु संस्कृतींत एकाग्रतेला फार महत्त्व दिलें आहे,” स्वामी म्हणालें.

“हो. चित्त लागतें. भटकणा-या चित्ताला ओढून आणून लावतों. पास होईन असें वाटतें,” नामदेवानें सांगितलें.

“अभ्यास सोडून आतां कां आलेत?” स्वामीनीं विचारलें.

“तुम्हाला एक विचारायला आलों आहोत,” नामदेव म्हणाला.

“गणित, शास्त्र वगैरे गोपाळरावांना विचारा. कांही मराठी, इंग्रजी असेल तर मला विचारा,” स्वामी म्हणाले.

“आम्हांला अभ्यासाचें नाहीं विचारावयाचें . दुसरीच एक गंमत आहे,” रघुनाथ म्हणाला.

“तुम्ही आमच्याबरोबर याल?” नामदेवानें विचारलें.

« PreviousChapter ListNext »