Bookstruck

धडपडणारी मुले 79

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“परंतु जर तर तोफा, तलवारी बोंब, बुंदका यांनी निर्भय होऊ पाहात आहे.” रघुनाथ म्हणाला.

“मृगजळांतून जळ मिळविण्याप्रमाणे तें आहे,” स्वामी म्हणाले.

“जर्मनी, जपान, इटली फ्रान्स ही निर्भय राष्ट्रे नाहीत?” रघुनाथनें प्रश्न केला.

“कोण म्हणतो निर्भय? सर्वांच्या पोटांत बागबुग होत असतें. अरे, एवढा रानचा राजा सिंह, परंतु तोहि सारखें मागें पाहात असतो. आपण सिंहावलोकन शब्दच बनविला आहे. हरणें, हत्ती यांचा संहार करणा-या सिंहाला सारखे वाटत असतें, माझ्यावर हल्ला करावयास नाही ना कोणी येत? जपानला वाटतें रशिया नाहीं ना स्वारी करणार, रशीयाला वाटतें, जर्मनी नाहींना झडप घालणार? इंग्लंडला वाटते इटली आपलें साम्राज्य धुळींत मिळविणार कीं काय? पाखरांच्या माना सारख्या नाचत असतात. किडें खाणा-या पांखरांना वाटतें मला खायला दुसरें नाहीं ना कोणी येत? सर्वांच्या माना नाचत आहेत. पुढें मागें होत आहेत. बॉंब, बंदुकांवर हात ठेवून घांस गिळीत आहेत. याला कां निर्भयपणा म्हणता येईल? नामदेव! जगांत अजून स्वतंत्र कोणीहि नाही,” स्वामीनी सिद्धांत मांडला.

“काय कोणीहि स्वतंत्र नाही?” रघुनाथने प्रश्न विचारला.

“आम्ही स्वतंत्र राष्ट्रे म्हणून टेंभा तर पुष्कळ राष्ट्रें मिरवितात,” नामदेव म्हणाला.

“ज्याला स्वतंत्र व्हावयाचें आहे, तो दुस-याला स्वतंत्र करील. सारे स्वतंत्र झाल्याशिवाय कोणालाहि स्वातंत्र्य नाही. इंग्लंडला वाटत असेल कीं आपण स्वतंत्र आहोंत. परंतु इंग्लंड हिंदुस्थानावर अवलंबून आहे. श्रीमंत हजारों नोकरांवर विसंबून असतो. हजारों टेके व आधार त्याला दिलेले असतात. ते आधार जरा काढा की गडगडलें श्रीमंताचे सिहासन हिंदुस्थान इंग्लंडचा गुलाम व इंग्लंड हिंदुस्थानचा गलाम. एक विलासी गुलामगिरी व एक दरिद्री गुलामगिरी. परंतु दोन्ही गुलामगि-याच. बेडी सोन्याची काय व लोखंडाची काय, बेडी ती बेडीच,” स्वामी म्हणाले.

सोन्याची लोखंडाची
बेडी ती बेडीच साची || बंधनी ||

नामदेवानें चरण म्हटला.

“रामतीर्थांचे हें गाणें आहे,” स्वामी म्हणाले.

“ॐ तत्सतची ललकारी,” रघुनाथनें खड्या आवाजात ललकारी मारली.

“होय. ही ललकारीच खरें स्वातंत्र्य आणील. मग तें केव्हां यायचें असेल तेव्हां येवो. तोंपर्यंत मानवी समाज धडपडणार. पुन्हां पुन्हा चुका करणार. रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळालें असेंच म्हणणार,” स्वामी म्हणाले.

“मग रणाशिवाय स्वातंत्र्य मिळेल? आजपर्यंत असें इतिहासांत एकतरी उदाहरण दाखवा,” रघुनाथ तीव्रतेने म्हणाला.

“युद्धानें युद्ध थांबल्याचे तरी एक उदाहरण दाखवा. द्वेषानें द्वेष शमल्याचें उदाहरण आहे का? १८७० मध्ये जर्मनीनें फ्रान्सचा नक्षा उतरला. फ्ररान्स मनांत तडफडत होता, जवळत होता. तरवारीच्या तेजाखाली तह झाले. शांतीचे तह झाले. परंतु त्या शांतीच्या पोटांत काळकूट होतें. १९१४ मध्ये तें काळकूट बाहेर पडलें. फ्ररान्सनें जर्मनीचे लचके तोडले. पुन्हा शांति आली! आंता पुन्हा ती शांति काय करणार आहे ते दिसतच आहे. रामरावणाच्या वेळेपासून लढावा होत आहेत. याचा अर्थ असा करावयास हवा की मनुष्याचा हा प्रयोग फसला. लढाईनें लढाई बंद करण्याचा प्रयोग दहा हजार वर्षें झाला. परंतु जगांतील लढाई संपत नाही. वावरून शहाणे होऊन मनुष्यानें नवीन मार्ग शोधून काढायाला हवा. दगडांच्याऐवजी बाण, बाणांच्याऐवजी बंदुका, बंदुकाऐवजी बॉंब, बॉंबच्याऐवजी विषारी धूर, त्या विषारी धुराऐवजी मारक किरण; अशा रीतीनें हिंसक साधनांत फरक करून संस्कृति येत नसते. आपण वृक व्याघ्र रीसच राहिलों मनुप्याला जिंकण्याची नवीन साधनें हवींत. वाघ नखांनीं जिकील. मनुष्यानेंहि का तसेंच करावयाचें? मग मानवाचा मोठेपणा कशांत राहिला? मोठा वाघ होणें ही का उत्क्रांति? वाघाला दोन इची नखें आहेत, मानवानें पांच फूट लांबीच्या बंदुकांची नखे लावून घेतलीं म्हणजे का उत्क्रांति?

“प्रेम, सहानुभूति, दया हीच शस्त्रे मानवाला शोभतात. यांचे कारखाने मानवी हृदयांत निघाले पाहिजेत. थोड्या प्रमाणांत ते आहेत. मोठ्या प्रमाणात निघाले पाहिजेत.” स्वामीना जणु किती बोलावें, काय बोलावें असें झालें होतें.

“परंतु प्रेम करणा-याला दुसरा मारील. मी प्रेम करतों म्हणून दुसरा करीलच असें नाही,” रघुनाथ म्हणाला.

« PreviousChapter ListNext »