Bookstruck

धडपडणारी मुले 82

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“मी नाहीं पडत. मी डोळे मिटून सुद्धां चालतें. डोळे मिटून जात्यांत वैरण घालतें. डोळे मिटून सरळ जात येतें की नाहीं ते मी पाहातें. परवां मी वाळवंटांत डोळे मिटून जात होतें तर तिकडून आली गाय! मी एकदम डोळे उघडले म्हणून, नाहींतर शिंगच डोळ्यांत जाऊन कायमचाच मिटला असता डोळा,” वेणू हकीकत सांगत होती.

“नामदेव, तूहि घे तो खडा. मीच एकटा खाऊ वाटते? वेणू मला हावरा म्हणेल,” स्वामी म्हणाले.

“त्यांना नसेल आवडत गूळ! आमच्या गांवांत ती श्रीपति आहे. तो इंग्रजी शिकतो धुळ्याला त्याला गुळ नाही आवडत.
त्याला साखर लागते,” वेणू म्हणाली.

“वेँणू! तुझा यांची ओळख नाही तरी तू कशी बोलतेस?” स्वामी म्हणाले.

“रघुनाथ सांगे म्हणून ओळख आहेच. तुम्ही बोलता, परंतु हे का बोलत नाहीत?” वेणूनें विचारलें.

“ते मुके आहेत,” स्वामी म्हणाले.

“ते पाहा हंसले. मुके नाहीत. जे मुके असतात ते बहिरे पण असतात. बोलाना हो तुम्ही कांहीतरी,” वेणू म्हणाली.

“त्यांना कांहीतरी बोलायला नाही आवडत, मुद्याचे जरूरीचे बोलायला आवडते,” रघुनाथ म्हणाला.

“त्याला बोलता नीट येत नाही. बासरी वाजविता येते,” स्वामी म्हणाले.

“बाबूची?” वेणूनें विचारलें.

“नाही. ब्रासची,” नामदेव म्हणाला.

“बघू दे,” वेणूने सांगितले.

नामदेवानें पिशवींतून बांसरी काढली व वेणूच्या हातात दिली.

“किती लांब व लकलकित आहे. ही देशी आहे?” वेणूनें विचारलें.

“हो. आतां देशी मिळतात. अमळनेरच्या खादीभांडारात मिळतात,” नामदेव म्हणाला.

“वेणू! आतां तुझी बासरी बंद कर,” रघुनाथ म्हणाला.

“माझी कोठली?” वेणूनें विचारले.

“म्हणजे कोठली?” वेणूनें विचारलें.

“म्हणजे तुझी टळळी,” स्वामी हंसत: म्हणाले.

“माझी टकळी म्हणजे वाटतें बांसरी! मी का इतकें गोड बोलतें?”
वेणूनें विचारलें.

“आज तरी गोड वाटतें आहे,” रघुनाथ म्हणाला.

“नामदेवाला ब्रासची बासरी वाजवता येते व वेणूची बांसरी पण वाजविता येते,” स्वामी म्हणाले.

“वेणू! घागर दे. येताना नदीची भरून आणू,” रघुनाथ म्हणाला.

“एकच देऊ?” तिनें विचारलें.

“एकच दे. ते पाहुणे आहेत,” रघुनाथ म्हणाला.

“मुळीच नाहीं. ते आपलेच आहेत. होय ना हो? म्हणून तुम्हीं खाऊ आणलात. बाबा कधीं आणीत नाहीत. कोणी आणीत नाहींत. रघुनाथभाऊ एखादे वेळेस येताना आणतो,” वेणू म्हणाली.

“बरें आम्ही जातों स्नानाला आतां, वेणूबाई,” स्वामी म्हणाले.

“मी कांही बाई नाही,” वेणू म्हणाली.

“मग काय बुवा वाटते?” रघुनाथ हसत व चिडवीत म्हणाला.

“मी नाहीं बोलत जा,” असें म्हणून वेणू रागावून घरांत गेली.

« PreviousChapter ListNext »