Bookstruck

धडपडणारी मुले 87

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“राममंदिरात उद्योगमंदिर. छान कबीर हा रामाचा उपासक होता व विणकरहि होता. ‘रामबिना कछु जानत नाही,’ असे म्हणत म्हणत कबीर विणी. ‘झिनीझिनी बिनी चदरिया’ असे गात घोटा फेंकी. कसें दिव्य, रसमय, रासमय व कर्ममय जीवन! सारे संत उद्योगी होती. कोणी विणकर, कोणी कुभार, कोणी सोनार, कोणी चांभार, कोणी माळी, कोणी साळी समाजाच्या उपयोगी धंदा प्रत्येक संत करी आणि त्या छंद्यांत सारी हृदयांची कला ओती, बुद्धीची दिव्यता ओती. कबिरानें विणलेल्या वस्त्रावर लोकांची दृष्टी ठरत नसे. गोरा कुंभार मडक्याची माती तुडविता तुडवितां इतका तन्मय होई की रांगत आलेलें मुलहि तुडवलें गेले तरी त्याल भान नाही! या समाजरुपी देवाला, जनताजनार्दनाला चांगले मजबूत मडकें तो देई. हीच कर्ममय पुजा,” स्वामी बोलत होते.

“गांवाला उंच दरवाजा होता. दरवाजाच्या आंतल्या बाजूस राममंदिर होतें व दरवाजाबाहेर ती म्हशीद होती.
सारीं जणें मशिदींत गेली. इतकी वर्षे झालीं तरी मशीद किती गुळगुळीत होती. भिंतीमध्ये स्वत:चे प्रतिबिंब दिसे.
गंभीर,शीतल, शांत त्या मशिदीत वाटत होतें.

“येथे पूर्वी वैभावाच्या काळांत कारंजी उडत असत. ही पाहा पडकीं कारंजी,” रघुनाथ दाखवीत होता.

“परंतु पाणी कोठून येई?” स्वामींनी विचारलें.

‘ती तिकडे विहीर आहे. तिला मोट असे. ती हत्ती ओढीत असे. असें सांगतात. मोटेचें पाणी वरती उंच खजिन्यांत जमा होई. तेथून ते कारज्यांत येण्याची व्यवस्था होती. हें पाहा एक जुनें भुयार आहे,” रघुनाथ बारीक सारीक दाखवीत होता.

“गावाच्या आंत राम व गांवाबाहेर रहीम. अंतर्बाह्य रहीम. अंतर्बाह्य परमात्मा या गावाचे रक्षण करीत आहे. आंत साकार देव, बाहेर निराकार देव!” स्वामी म्हणाले.

“देवपूर नांव यथार्थ आहे,” नामदेव म्हणाला.

“चांगले आहे की नाही गांव?” रघुनाथनें विचारलें.

“गोड आहे, रमणीय आहे,” नामदेव म्हणाला.

“नदी असली म्हणजे निम्मे सौदर्यं आधी गांवाला लाभतें. उरलेलं निम्मं सौदर्यं माणसानीं प्रेमाने व सहकार्यानें वागून निर्माण करावयाचे असते,” स्वामी म्हणाले.

“चला, आतां जाऊ. नदीवर येतो?” रघुनाथनें विचारले.

“हो, चला. नदीचें दर्शन सदैव नवीनच आहे. नदीला पाहून मला कधीच कंटाळा येत नाही,” स्वामी म्हणाले.

"सारी मंडळी नदीवर आली. स्वामी चूळ भरून डोळ्यांना पाणी लावून आले. बाळवंटात सारी मंडळी बसली. संध्याकाळ होत आली होती सूर्याचें शेवटचे किरण पाण्यांत सायस्नान करीत होते. सारें आकाश लाल, लाल होऊन गेलें होते.

“नामदेव! तो बघ महान् चितारी आकाशाच्या फलकावर चित्रे काढू लागला,” स्वामी म्हणाले.

“देवाला सायंकाळी अधिक फुरसत असते वाटते?” नामदेवानें विचारलें.

“कलेचा खऱा विकास विश्रांतीच्या वेळच होत असतो. जेव्हा आपल्या पाठीमागे इतर भुगभुग व भुणभुण नसते. त्यावेळेसच आपल्याला आवडणा-या गोष्टींत आपण रंगून जातो. दिवसभर पोटासाठी उद्योग मनुष्य करतो त्यांत त्याचें हृदय असतेच असें नाही. परंतु तो पोटाचा उद्योग मनुष्य करतो. त्यांत त्याचें हृदय असतेंच असें नाही. परंतु तो पोटाचा उद्योग संपला म्हणजे त्याचें हृदय असतेंच असें नाही. परंतु तो पोटाचा उद्योग संपला म्हणजे कोणी गातो, कोणी वाजवतो, कोणी चितारतो, कोणी फुलें फुलवतो, कोणी खेळतो, कोणी काही करतो. या गोष्टीतूनच मनुष्याच्या हृदयांतील राम प्रगट होतो. ‘पोटापुरतें व्हावें काम| परी अगत्य तो राम || पोटाचे धंदे असू देत. परंतु ज्यांत तुमचें हृदय रमेल, जेथे तुम्हाला रामदर्शन होईल असें काहीतरी प्रत्येकाजवळ असले पाहिजे,” स्वामी म्हणाले.

« PreviousChapter ListNext »