Bookstruck

धडपडणारी मुले 98

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“महाराष्ट्रातील एक प्रख्यात साहित्यिक एकदां म्हणाले, ‘महात्माजींनीं हरिजनोद्धाराची चळवळ सुरु केली. लागले त्यासंबंधीं गोष्टी लिहायला. एक होती म्हारीण. ती गेली पाण्याला. सनातनी आले. त्यांनी तिला दगड मारले. तिला लागलें. परंतु तिचें मडकें फुटलें. त्याचेंच तिला फार वाईट वाटलें. कपाळांतून रक्ताची धार निघाली, तरी तिला तितकें वाईट वाटलें नसतें. परंतु फुटलेल्या मडक्यांतून धार लागेल याची तिला चिंता वाटली. झाली गोष्ट. ना कला, ना कला, ना तंत्र, ना कांही.’

“त्या प्रख्यात साहित्यिकांना मला असें विचारावयाचें आहे की, ती गोष्ट लिहिणाराला तुमचें तंत्र व यंत्र नसेल माहीत. परंतु तुम्ही तर सगळे अभिजात कलावंत, नामवंत कलावंत आहात ना ? मग तुम्हीच का लिहीत नाही त्या हरिजन चळवळीवर ?  कां तुम्हाला ती वस्तु महत्त्वाची वाटत नाहीं ? लाखों लोकांची भस्म होणारी जीवनें पै किमतीची वाटतात ? माणसें पशूसारखी केली जात आहेत – तें पाहून नाही का हृदय हालत, नाही का जळत बुद्धि, नांही का येत डोळ्यांना पाणी ?

“महात्माजींसारखा मातींत पडलेल्या राष्ट्राला नवजीवन देणारा महापुरुष ! तो हरिजनांसाठी मोलवान प्राणाचा महान् यज्ञ पेटवतो. दगडांनाहि पाझर फोडणारें हें भव्य दर्शन पाहून तुम्हां कलावंतांची हृदयें उडत नाहींत, लेखणी तळमळत नाही. आणि तुमचें हे अश्मत्व पाहून, तुमची ही आळशी वृत्ति पाहून जर दुसरा एखादा कमी कलातंत्राचा मनुष्य तें ध्येय आपल्या शक्त्यनुसार मांडूं लागला तर त्याची टर उडवता का ?

“अरे महाराष्ट्रातील कलावंतांनो ! हीं महान् ध्येयें तुमच्या आजूबाजूला तुमचा स्पर्श व्हावा म्हणून तिष्ठत आहेत. ध्येयभगवान्, ध्येयसूर्य तुमच्या दारांत उभा आहे. जरा दारें उघडा व तुमच्या त्या डांसाचिलटांच्या, ढेकणांच्या खोलींत हा प्रकाश घ्या. कलेचें महान् स्थान धुळींत मिळवू नका. कलादेवीला डबक्यांत बुडवूं नका. चिखलांत बरबटवूं नका.

“राष्ट्रांतील दुःखाला वाचा फोडा. पांढरपेशा सुखासीन लोकांना बेचैन वाटेल असें लिहा, असें गा. अशा जळजळीत कलाकृति निर्माण करा की, सारें राष्ट्र एक हांक देऊन उठेल. शतबंध तोडायाला उठेल.

“महाराष्ट्रांतील हजारों खेड्यांतील जनताजनार्दनाचें, दरिद्रीनारायणाचें दर्शन घ्या. खरा महाराष्ट्र म्हणजे कॉलेजांतील प्रेमाचे खेळ करणारी चार श्रीमंतांचीं पोरें नव्हेत. खरा महाराष्ट्र तुम्ही पाहिलाही नाही. महाराष्ट्राचें दर्शन न घेतांच भराभरा महाराष्ट्राचे आवडते कादंबरीकार व आवडते कवी तुम्ही होत आहात. महाराष्ट्राचे आवडते म्हणजे चार सुशिक्षित सुखवेल्हाळांचे, हाच अर्थ नव्हे का ?

« PreviousChapter ListNext »