Bookstruck

धडपडणारी मुले 101

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“अरे, या पर्वतीवर कितीकांचे पाय लागलें असतील! नानासाहेब पेशवे, भारतीय योद्धे भाऊसाहेब,
चिमणासिंहाचा छात्रा विश्वसराव, ते थोर पाहिले माधवराव, ते रामशास्त्री, ते नाना-सारे या पर्वतीवर आले असतील. महादजीसारखे वीर येथें आले असतील. रमाबाईंसारख्या थोर सती येथे आल्या असतील! या पर्वतीच्या आजूबाजूस पाहा. तो पाहा सिहगड! शिवाजीमहाराजांच्या जीवनरामायणांतील सुंदरकांड लिहिणारा तो थोर तानाजी! आधीं कोंडाण्याचे लगीन, मग रायबाचें! किती थोर शब्द ! ते शब्द आजच्या महाराष्ट्राला नाहीं का कांही स्फूर्ति देत? या पर्वतीवर देहू, आळंदी, सासवड, चिंचवड सर्व ठिकाणींहून पवित्र वारे येत आहेत.

“पर्वतीनें पूर्वींचे पावित्र्य पाहिलें, आजचेंहि पावित्र्य पाहिलें आहे. ते पुण्याचे महादेवाप्रमाणे थोर न्यायमूर्ति रानडे, ते थोर त्यागमूर्ति निर्भय आगरकर, ते मरतानाहि देशाची चिंता करणारे नामदार गोखले, ते अलोट बुद्धीचे अलोट धैर्याचे, धीरोदात्त लोकमान्य – सारे या पर्वतीवर शतदा आले असतील!

“पर्वतीवरचे अणुरेणु पवित्र आहेत. ते महाराष्ट्राच्या यशापयशाचे इतिहास मला सांगत आहेत, ‘भाऊ भाऊ’ करीत नानासाहेब येथें मरण पावले! आनंदाश्रू व दु:खाश्रू या पर्वतीवर पडलेले आहेत. नामदेव! तुम्हांला थोडक्यात काय सांगू? सांगण्यासारख्या मन:स्थितीत मी नाही. महाराष्ट्राची रामायणमहाभारतें माझ्या हृदयांत उचंबळलीं आहेत. महाराष्ट्राचा जरीपटका, भगवा झेंडा मराठ्यांचा चौफेर उधळणारा घोडा,” सारें माझ्या डोळ्यांसमोर येत आहे. मी काय बोलू? काय करूं?”

स्वामी पुन्हा मूक झाले. बोलणें त्यांना जड जात होतें.

“चला आतां जाऊ,” स्वामी म्हणाले.

“चला,” नामदेव, रघूनाथ म्हणाले.

“पर्वतीच्या मंदिराला पेशव्यांनी सोन्याचे कळस लावले. शिवाजी महाराजांनी सारें वैभव प्रतापगडच्या देवीच्या मंदिरासाठी खर्च केलें. परंतु मराठी राजांचा राजवाडा साधाच राहिला. पेशव्यांचा शनिवारवाडा साधाच राहिला. तेथें सोन्याचे कळस कोणीं लावले नाहीत. मराठी राजा वैभव देवासाठीं होतें. देवाचा मोठेपणा!” स्वामी एकदम म्हणाले.

“पर्वतीवर फिरावयास येणा-यांना इतिहासाचें स्मरण होत असेल का?” नामदेवानें विचारलें.

“ ते शरिराला लागणा-या हवेसाठी फिरावयास येतात. त्यांना आत्म्याची हवा नको असते. येथें पर्वतीवर येऊन ते चिवडा खातील, बोलपटांची चर्चा करतील! येथील अणुरेणु त्यांच्याजवळ बोलणार नाहीत. येथील वारा त्यांच्याजवळ महाराष्ट्रांतील पावित्र्याचीं व पराक्रमाचीं गाणीं गुणगुणणार नाही,” स्वामी म्हणाले.

« PreviousChapter ListNext »