Bookstruck

धडपडणारी मुले 111

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“किती सुंदर आहे गाणे!” स्वामींनी म्हटले.

“आता आम्ही जातो.” असे म्हणून ती मुले गेली.

स्वामी म्हणाले, “नामदेव, किती वाजले?”

“अकरा वाजायला आले,” तो म्हणाला.

“नामदेव, मी आजच जातो. उद्या रात्री अमळनेरला पोचेन. अजून १२-१० ची गाडी मिळेल,” स्वामी म्हणाले.

“तुम्हाला फारच जावे असे वाटत असेल तर आम्ही राहाण्याचा आग्रह करणार नाही. तुमचे मन प्रसन्न राहील ते करा. तुमची अंत:स्फूर्ति सांगेल तसे वागा,” नामदेव म्हणाला.

“चला तर मग. आपण निघूच,” स्वामी म्हणाले.

“आपण पायीच जाऊ. येताना आम्ही सायकलीवरून येऊ,” रघुनाथ म्हणाला.

“चला गप्पा मारीत जाऊ,” नामदेवाने संमति दिली.

सायकलीच्या दिव्यांत तेल आहे की नाही ते पाहून दोघे मित्र निघाले.

“नामदेव! तुम्ही दोघे पोटभर जेवता का नाही? रघुनाथ व तू—दोघांचा खर्च तुला चालवावा लागतो. घरून पैसे तर तुझ्यापुरतेच येत असतील,” स्वामींनी विचारले.

“मी डबा मागवला किंवा खाणावळीत जेवलो तर तेवढा खर्च येईल, त्यापेक्षा आम्हांला खर्च कमी येतो. मी खाणावळीत गेलो तर चवदा-पंधरा रुपये खर्च येणारच. आम्ही दोघे हाताने स्वयंपाक करतो. आम्हांला दहा रुपये पुरतात. भांडी वगैरे आम्हीच घासतो. खोलीचे भाडे पाच रुपये आहे. त्यामुळे तशी चिंता नाही. रघुनाथला निम्मी नादारी आहे.  उरलेल्या फीचे पैसे काही मित्र वर्गणी करून जमवितो. आणि रघुनाथ गोष्ट लिहून काही पैसे मिळवितो. नवाकाळ, चित्रमयजगत् यांतून त्याच्या दोन गोष्टी प्रसिद्ध झाल्या व त्याला दहा रुपये मिळाले. तसेच गीतेवर त्याने निबंध लिहिला, त्यातहि त्याला बक्षीस मिळाले आहे. तुम्ही काही चिंता करू नका. मनाला लावून घेऊ नका,’ नामदेव म्हणाला.

« PreviousChapter ListNext »