Bookstruck

धडपडणारी मुले 117

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

"माझ्या मनात असे आले की, तुम्ही त्यासाठी काही त्याग करावा तरुण-ग्राम सेवक मंडळ म्हणून काढावे, आणि तुम्ही या मंडळाचे सभासद व्हावे. या मंडळास महिना चार आणे वर्गणी असावी, ही जी वर्गणी जमा होईल, तिच्यांतून आपण ग्रामसेवकांस मदत करू शकू  तुमच्यावर मी दडपण टाकू इच्छितो असे नाही. परंतु तुम्हाला मनापासून जर मदत करता येत असेल तर ती तुम्ही करावी , यावर तुमचे काय विचार आहेत ? आपण खुल्या मनाने चर्चा करू या," स्वामी म्हणाले.

"असे मंडळ वैगरे तुम्ही स्वतंत्र काढा. आम्हाला काही मदत करावयाची झाली तर करीत जाऊ परंतु हे महिन्याचे बांधलेले नको," एक मुलगा म्हणाला.

"तुम्ही गावातील सभ्य लोकांकडून का नाही वर्गणी जमवीत? आम्ही अजून विद्यार्थी आहोत. आमच्या पैशाचे आम्ही मालक नाही ! छात्रालयातील ग्रंथालयाला दोन आणे वर्गणी देतो, त्याबद्दल घरी पालक कुरकुर करीत असतात. आता आणखी चार आणे कोठून द्यावयाचे ?" दुसरा एक म्हणाला.

“एखादा आमचा मेळा तयार करावा. तिकिट लावून त्याचा गावांत खेळ करावा. एकदम दोनतीनशे रुपये मिळतील. एखाद्या सुट्टीच्या दिवशी तोच मेळा जळगांवला न्यावा. तेथेही पैसे मिळतील. घरच्या लोकांवरही बोजा नाही, आणि मेळ्यामुळे विचार-प्रसारही होईल. नाहीतरी आमच्यापासून अशी कितीशी वर्गणी जमा होणार ? समजा शंभर मुलांनी चारचार आणे प्रत्येकी दिले, तरी फारतर पंचवीस रुपये जमा होतील. वर्षाला दोनशे रुपये जमतील. परंतु आपण मेळा काढला तर सुट्टीत निरनिराळ्या ठिकाणी जाऊन कितीतरी अधिक पैसे जमा करता येतील !” एक मुलगा म्हणाला.

“ही सूचना चांगली आहे.” एकाने अनुमोदन दिले.

“परंतु सुट्टीमध्ये घरी जाण्याऐवजी माझ्याबरोबर मेळ्यात काम करावयास याल का ? मागे महाराष्ट्रात पैसाफंडासाठी मेळ्याचे कार्यक्रम करून पैसे मिळविण्यांत आले होते. दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत काढावा मेळा. परंतु मुले मिळाली पाहिजेत,” स्वामी म्हणाले.

“आम्ही येऊ तुमच्याबरोबर,” काही मुले म्हणाली.

“तुमचे पालक परवानगी देतील का ?” स्वामींनी शंका विचारली.

“हो, त्यात वाईट असे काय आहे ?” एक मुलगा म्हणाला.

“परंतु मेळ्याची योजना होईल तेव्हा होईल. मंडळ सुरू करावे. ज्यांना प्रासंगिक किंवा नियमित मदत देता येईल त्यांनी द्यावी. गावातहि स्वामींनी हिंडावे,” शिवलाल म्हणाला.

« PreviousChapter ListNext »