Bookstruck

धडपडणारी मुले 145

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“तुझ्या करांतील बनून पावा
कृतार्थ हा जन्म मदीय व्हावा,
बनेन वेणू तव मी मुखीची
असे असोशी प्रभु एक हाची,”

नामदेवाने श्लोक म्हटला.

“कोठला हा श्लोक?” रघुनाथने विचारले.

“स्वामींच्या स्तोत्रांतला,” नामदेव म्हणाला.

रघुनाथेने वेणूला हात धरून सर्वत्र नेले. स्नानगृहात नेले, शौचकूपात नेले. त्याला वाईट वाटत होते. अगतिक, निराधार वेणू !

सर्व मंडळी जेवावयास बसली. वेणू चाचपडत जेवत होती.

“वेणू ! भजीचा रस मिठात चालला बघ. सारे खारट होईल,” रघुनाथ म्हणाला.

“मला आता सारेच गोड ! सारे एकरूपच दिसणार. वाईट नाही, चांगले नाही,” वेणू म्हणाली.

“निशा मला गोड उषाहि गोड
सुधा मला गोड विषेहि गोड,”

नामदेवने चरण म्हटले.

“कोठले हे चरण?” रघुनाथने विचारले.

“स्वामींच्या वहीतले,” नामदेव म्हणाला. 

वेणूला एकदम ठसका लागला. “भाऊ! पाणी रे पाणी. कोठे आहे भांडे?” वेणू पाहू लागली. नामदेवाने एकदम तिच्या हातांत भांडे दिले. ती पाणी प्यायली. जेवणे झाली.

“रघुनाथ ! तू वेणूला हात धरून ने नळावर. मी भांडी सारी उचलतो,” नामदेव म्हणाला.

“सारी ताटे तुम्ही गोळा करणार ? माझेही ताट तुम्ही उचलणार ? भाऊ! तूच उचल नारे सारी ताटे. मी बसते तोवर. मग माझा हात धरून ने,” वेणू म्हणाली.

« PreviousChapter ListNext »