Bookstruck

धडपडणारी मुले 148

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“एक रामाची तसबीर आहे आणि दुसर्‍या फोटोत मी व नामदेव आहोत,” रघुनाथ म्हणाला.

“तुम्ही दोघे एका फोटोत?” वेणूने विचारले.

“हो, छान आहे फोटो. परंतु तुला कोठे दिसतेय़?” रघुनाथ म्हणाला.

“भाऊ! मला देशील तो फोटो? मी आईला दाखवीन. आईला तुझी कितीतरी आठवण येते. आपला फोटो आपल्याजवळच ठेवण्यात रे काय मजा?  ज्याच्याजवळ आपण आहे, त्याच्याजवळ तो ठेवण्यांत अर्थ आहे. खरे ना?” वेणूने मार्मिक प्रश्न केला.

“हो, तू घेऊन जा,” रघुनाथ म्हणाला.

“ मग तो निट बांधून ठेव,” वेणू म्हणाली.

रघुनाथने फोटो बांधून एका पिशवीत भरून ठेवला.

रात्री स्वामी निघाले. वेणू निघाली. रघुनाथ व नामदेव स्टेशनवर पोहोचवायास गेले. तिकिटे काढून मंडळी प्लँटर्फावर गेली. वेणू आंत खिडकीजवळ बसली. तो फोटोची पिशवी तिच्या हातात होती. स्वामी बोलत होते. वेळ संपत आली. घंटा झाली.

“भाऊ, जाते मी. आता मला पत्र लिहिता येणार नाही. पत्र आलेले वाचता येणार नाही. भिकाच्या पत्रातच आता सारे लिहीत जा. निराळे पत्र नको. वेणू जणू आता निराळी नाही. वेणूचे डोळे गेले व वेणूचे निराळेपण गेले,” वेणू म्हणाली.

“उगीच रडत जाऊ नकोस. आशेने रहा. एखद दिवस येतील तुझे डोळे. खरोखर येतील,” रघुनाथ म्हणाला.

“मी सूत कातीन. गाणी गाईन. डोळे मिटून कातण्याची मी सवयच केली होती. खूप कातीन. तुम्हाला त्याची धोतरे होतील. माझ्या हातच्या सुताची धोतरे,” वेणू म्हणाली.

पुन्हा घंटा झाली. शिट्टी झाली.

“बरे, नामदेव, रघुनाथ!  मी काय ते पत्र पाठवतो, गोपाळरावांचा सल्ला घेतो,” स्वामी म्हणाले.

“बरे वेणू,” नामदेव म्हणाला.

“तुम्हाला सुती धोतरे देईन बरे का,” वेणू म्हणाली.

“मी नेसेन,” नामदेव म्हणाला.

निघाली गाडी. भगभग करीत गेली. आंधळी वेणू खिडकीवाटे अनंत सृष्टी बघत होती. वासनाविकारांची, भावनाविचारांची, आशानिराशाची, पापपुण्याची, सदसंतांची, सुखदु:खाची महान् सृष्टी ती बघत होती.
“वेणू, तू पडतेस का?” स्वामींनी विचारले.

“मी अशीच बसते. माझे डोळे नेहमी मिटलेलेच आहेत. तुम्ही पडा. मी तुमच्या पायाशी अशी बसते.” असे म्हणून वेणूने ती पिशवी हृदयाशी घट्ट धरिली! त्या लहानशा पिशवीत तिची मोलाची माणिकमोती होते. आंधळ्या वेणूचे सर्व सौभाग्य, सर्व धाम त्या पिशवीत होते.

« PreviousChapter ListNext »