Bookstruck

धडपडणारी मुले 153

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

रघुनाथने नामदेवाचा हात वेणूच्या हातांत दिला.

“हा त्यांचा हात! हे रे काय?” वेणू लाजत म्हणाली.

“ही तुझी काठी! पुण्याला या काठीने तुला नळावर नेले होते आठवते? येथे ही काठी तुला सर्वत्र हिंडवील. मजबूत काठी आहे. न घसणारी, न मोडणारी, स्वामींना आवडणारी- अगदी स्वदेशी काठी,” रघुनाथ हसत म्हणाला.

“मला वाटलेच होते की तुम्ही दोघे याल म्हणून. तुम्ही आश्रमांत राहणार, होय ना? भाऊ, मी चुलीजवळ भाकरीसुद्धा भाजते. येथे घरी असतेत तर मी तुम्हांला वाढली असती माझ्या हातची भाकरी,” वेणू म्हणाली.

“परंतु तुझ्या हातची धोतरे कुठे आहेत?” रघुनाथने विचारले.

“खरेच, मी विसरलेच. कशी धुऊन नीट घड्या करून भिकाने ठेविली आहेत. परंतु तुम्ही आता कशाला घेता?  आतां येथे सुटीत काम करणार ना? ती फाटतील. तुम्ही शिकायला जाल, तेव्हा ती घेऊन जा. म्हणजे तुम्हांला बरेच दिवस पुरतील. बरेच दिवस वेणूची आठवण राहील. आंधळ्या गरीब वेणूची,” वेणू कांप-या आवाजात म्हणाली.

“आई कोठे आहे?” रघुनाथने विचारले.

“नदीवर गेली आहे, येईलच आतां,” वेणू म्हणाली.

“आम्ही जातो वेणू, मग दुपारी भेटू पुन्हा.” असे म्हणून रघुनाथ व नामदेव गेले.

रघुनाथ व नामदेव गावांत अनेकांना भेटले. रस्ता दुरुस्त करण्याबद्दल बोलले. गावांतील लोकांना अचंबा वाटला. काही साशंकवादी म्हणाले, ‘आधी येऊ द्या तर खरी मुले. मग पाहू गाड्यांचे. कोणी येणार नाही. शाळेत शिकणारी श्रीमंतांची मुले का रस्ता खणायला येतील, खडी फोडायला येतील?’

स्वामी अमळनेरच्या काही व्यापा-यांना भेटले. व्यापा-यांनी या कामाला सहानुभूती दाखविण्याचे कबूल केले. शंभर मुलांना महिनाभर जेवावयास जे सामान लागेल ते पुरविण्याचे त्यांनी कबूल केले. डाळ रोटी हेच मुख्य खाणे ठरविण्यात आले. बेसनाचे पीठहि आणण्यांत आले. तेलाचे, तुपाचे डबे घेण्यांत आले. गुळाच्या भेल्या घेण्यात आल्या. लागणारे सारे सामान व्यापा-यांनी पुरविले. ‘काय कमी पडेल ते घेऊन जा,’ असे ते म्हणाले.

जिनच्या व्यापा-यांकडे जाऊन ताडपत्र्या स्वामींनी घेतल्या. जिना बंद होत्या. त्यामुळे ताडपत्र्या पडलेल्या होत्या. रात्री वाळवंटांत ताडपत्र्या पसरल्या की झाली झोपायची बिछाईत! मोठमोठी भांडीहि जमविण्यांत आली. जेवावयास केळीची पाने किंवा पत्रावळी असा बेत होता.

« PreviousChapter ListNext »