Bookstruck

धडपडणारी मुले 156

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

"जा. तू जरा विश्रांति घे. बराच भाजला हात,” स्वामी म्हणाले.

नामदेव शांतपणे राममंदिरांत आला. तो राममंदिरात त्याला एक मंगल गोष्ट दिसली. वेणू राममंदिरांत आली होती. दुसरे कोणी नव्हते. रामाच्या पायांजवळ वेणू होती. वेणूने रामाचे पाय धरले होते. रामाचे पाय हातांनी घट्ट धरून ती रामरायाच्या मुखचंद्राकडे पाहात होती! किती उत्कंठेने ती पाहांत होती; किती प्रेमाने व भक्तीने ओथंबून येऊन ती पाहात होती. वर डोळे करून ती दोवाजवळ प्रकाश का मागत होती, दृष्टी का मागत होती? भक्ति मगात होती का मुक्ति मागत होती? का काहीच मागत नव्हती? ते शब्दहीन पाहणे होते? ती केवळ प्रार्थना होती?

ते दृश्य पाहून नामदेवाला काय बरे वाटले? ज्यांना देवाने डोळे दिले आहेत, ते इतक्या प्रेमाने भगवंताची मूर्ति कधी पाहातात का? आंधळी वेणू पाहात आहे आणि डोळस लोक आंधळे आहेत! नामदेवाला स्वत:च्या खोलीतील रामाची तसबीर आठवली. छात्रालयांत असताना आपल्या खोलीत येऊन त्या रामाच्या तसबिरीवर स्वामींनी असेच एकदा डोके ठेवले होते! असेच दारांत येऊन आपण पाहात होतो! वेणू आंधळी की मी आंधळा? इतक्या भक्तिने मी कधी पाहिले आहे का देवाकडे? माझ्या खोलीतील तसबिरीकडे? माझ्या फोटोकडे जितक्या प्रेमाने मी पाहिले असेल, तितक्या प्रेमाने रामाला पाहिले नसेल! शोभा म्हणून माझ्या खोलीत रामाची तसबीर आहे. हृदयाला उन्नत व पवित्र करण्यासाठी म्हणून नाही!

नामदेवहि हळूच देवाजवळ गेला.

“वेणू! माझेहि हात देवाच्या पायांवर ठेव. तुझ्या हाताने माझेहि हात देवाच्या पायांवर ठेव. घे हे माझे हात, “नामदेव खिन्न स्वरांत म्हणाला.

“द्या तुमचे हात,” वेणू म्हणाली.

वेणूने नामदेवाचे हात रामाच्या पायांवर ठेवले.
“आतां आपण दोघांनी एकदम ठेवू या,” ती म्हणाली. दोघांनी हात ठेवले.

“आतां आपण दोघांनी आपली शिरे देवाला वाहूं या,”
दोघांनी आपली मस्तके देवाला दिली. दोघांची डोकी एकमेकांना लागली.

“तुमचा हात सुजला आहे?” वेणूने विचारले.
“तो भाजला आहे, ” नामदेव म्हणाला.

“कां हो आपला हात पुन्हां पुन्हां भाजता? असा सुंदर, गोड, गोंडस हात! देवाचे पाय धरम्याची इच्छा करणारा पवित्र हात- का त्याचे हाल करता? तुमचा हात भाजला म्हणजे माझाच हात भाजला असे मला वाटते. खरेच. माझ्या हाताची आज अशीच आग होत होती. म्हणून तर मी रामाचे पाय येऊन धरले. शंकराच्या विषाची आग रामाने शांत केली. त्या रामाचे पाय धरून हात शांत होतील असे मला वाटते. माझ्या हाताची आग कां होत होती ते आतां कळले. तुमचा हात आतां तुमचा नाही. तो माझा आहे. माझ्या परवानगीशिवाय त्या हाताचे तुम्हाला काही नाही करता येणार. रामाची साक्ष, ”
“वेणू! मी मुद्दाम नाही भाजला! वरण कढत त्यावर सांडले. मी काही वेडा नाही किंवा इतका विरक्त नाही. मी साधा जीव आहे,” नामदेव म्हणाला.

“तुम्हाला जेवायचे असेल ना? जा ना आतां. स्वामी वाट पाहात असतील,” वेणू म्हणाली.

“मी जातो. ” असे म्हणून नामदेव गेला.

« PreviousChapter ListNext »