Bookstruck

धडपडणारी मुले 162

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“आम्हीसुद्धा जाताना नेऊ, किंवा दिवाळीच्या सुट्टीत जर आलो तर त्यावेळेस नेऊं. पुढे नाताळच्या सुट्टीत तेथे खपवूं, ” नामदेव म्हणाला
“आपल्या देवपूरच्या आश्रमाचे नाव सर्वत्र जाऊं दे, ” भिका म्हणाला.

बोलत हसत जेवणे झाली. प्रार्थनेला सर्व मंडळी बसली. वेणूने प्रार्थना सांगितली.

कान्हा लाज राखी मेरी
तू गोवर्धनधारी ।।का.।।
हम पतित तुम करुणासागर
दुष्ट करत बलजोरी ।।का.।।
मीराके प्रभु गिरिधर नागर
तुम पिता मैं छोरी ।।का.।।

पहाटे वेणू व तिची आई दळीत होती. नामदेव व रघुनाथ तेथे गेले.

“ऊठ, आई तू ऊठ. आज आम्ही दोघे मित्र येथे दळतो. जातां जातां नामदेवाला दळून जाऊ दे. आईची सेवा करणा-याला चक्की मिळत असते. ”

“भाऊ! तू नी मी दळूं. त्यांना बसू दे. ते गाणे म्हणतील. माझ्यापेक्षां त्यांचाच आवाज गोड आहे. माझ्या डोळ्यांपेक्षां त्यांचेच मोठे आहेत डोळे. माझे डोळे गेले. येतील. एक दिवस येतील, ” वेणू म्हणाली.

“नाहीतर आपण तिघे दळूं, ” रघुनाथ म्हणाला.

“भाऊ! त्यांचा हात त्या दिवशी भाजला आहे. अजून बरासुद्धा नसेल झाला. त्यांना नको रे दळायला लावूं,” वेणू म्हणाली.

“तुमचा हात माझ्या हाताला लागून भाजलेला हात बरा होईल. या तिघांचे हात खुंट्याला लागूं
दे, ” नामदेव म्हणाला.

खरेच तिघेजण दळू लागली. खाली रघुनाथचा हात, मध्ये वेणूचा हात व वर नामदेवाचा हात!

“जाते जड कां येते? तिघांचे हात, तरी जड येते? ” वेणू म्हणाली.

« PreviousChapter ListNext »