Bookstruck

धडपडणारी मुले 167

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

“अशीच हृ्द्ये जोडा. आश्रमाचा विस्तार म्हणजे समान ध्येयाच्या माणसांचा विस्तार. जीवाला जीव देणा-या, एकरूप झालेल्या व्यक्तिंचा विस्तार,” स्वामी म्हणाले.

“मी जातो,” रघुनाथ म्हणाला.

“जा,” स्वामी म्हणाले.

रघुनाथ गेला. एकटाच गेला. नामदेव गेला. एकटाच गेला. स्वामी गेले. एकटेच गेले.

एकटे कोण जाणार ? जीवंत मनुष्य कधी एकटा नसतो. रघुनाथ अनेकांजवळ मनांत बोलत जात होता. क्षणांत आईजवळ बोले, तर क्षणांत बाबांचीहि त्याला आठवण येई. त्याचे बाबा आईला छळीत, परंतु त्याच्य़ावर त्यांचा माया होती. आईच्या कैवाराने रघुनाथने बाबांचा प्रेमबंध जवळजवळ तोंडला होता. परंतु आज एकटा जात असता त्याला त्यांच्या अनेक आठवणी आल्या.

स्वामी ! ते का एकटे जात होते ? आश्रम त्यांच्याबरोबर होता. यशवंत डोळ्यासमोर होता. प्रचारक मनात होते. कितीतरी कल्पना डोळ्यासमोर होत्या.

आणि नामदेव ! तो का एकटा जात होता ? त्याच्याजवळ पिशवी होती. पिशवीत खादीची धोतरे होती. त्या धोतरात वेणूचे हृद्य होते. वेणू होती.

पुण्याहून वेणूने नामदेवाला पिशवीत घालून आणले. कोणी चोरून नेईल म्हणून ती झोपलीसुद्धा नाही. पिशवी हृदयाशी धरून ती घेऊन आली. नामदेवाने आता तेच केले. लबाड नामदेव वेणूला घेऊन जात होता. पिशवीत घालून घेऊन जात होता. कोणाला दिसत नव्हते, कळत नव्हते! लबाड नामदेव!

रघुनाथ वडिलांचा विचार करीत जात होता. स्वामी आश्रमाचा विचार करीत जात होता. नामदेवाच्या हृदयमंदिरांत, जीवनवृंदावनांत वेणूची मंजूळ मोहक मुरली मधुरपणे वाजू लागली. नामदेवाच्या घरी वेणूनाद होऊ लागला, नामदेवाच्या जीवनांत वेणूसुधेचा वर्षाव होऊ लागला.

नामदेव, जप हो जप! शेवटी आश्रमाला वाढवावयाचे आहे, खानदेशला मोठे करावयाचे आहे, भारताचे अश्रू पुसावयाचे आहेत—हे नको विसरू. वेडावाकडा जा. परंतु सेवेच्या सागराला शेवटी येऊन मिळ. धडपड करीत करीत शेवटी ध्येयभगवानाची भेट घे.

« PreviousChapter ListNext »