Bookstruck

तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता ।

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१८४८-४९
तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता ।
बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ॥
श्रीमहाराज तीन वर्षांचे झाल्यावर घरातल्या माणसांची नजर चुकवून एकटेच बाहेर कुठे तरी जात. त्यांच्या सुईणीचे त्यांच्यावर फार प्रेम होते. पुष्कळ वेळा ते तिच्या घरी जाऊन ’मला भूक लागली आहे, मला खायला दे ’ असे सांगत. तिनेदेखील मोठया प्रेमाने दूध-भात किंवा दहीभात त्यांना खायला घालावा आणि कडेवर घेऊन घरी पोचवावे. श्रींना चौथे वर्ष लागल्यावर आजोबांनी त्यांना धुळाक्षरे काढायला शिकविली आणि विशेष म्हणजे नातवानी एका दिवसात ती शिकून घेतली. एकदा असे झाले की, रात्री ११ वाजले तरी श्रींना झोप आली नाही म्हणून आजोबांनी "अनन्याश्र्चिन्तयन्तो मामू ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‍ ॥ हा गीतेतील ( ९ / २२ ) श्र्लोक म्हटला. श्रींनी लगेच त्यांच्या पाठोपाठ तो श्र्लोक म्हटला. श्रींनी लगेच त्यांच्या पाठोपाठ तो श्र्लोक जसाच्या तसाच पण बोबडया वाणीने म्हणून दाखविला. आजोबा म्हणाले, " अरे, तू तर एकपाठीच आहेस !" दुपारी पंत विठठलमंदिरात पुराण श्रवणास बसत. तेथे हा बालक आपणास सर्व काही समजते म्हणून श्रवणास बसे. सायंकाळी जेवण झाल्यावर आजोबा आपल्या नातवास पुराणातील देवभक्तांच्या प्रेमळ गोष्टी सांगत. गोष्टी संपताच भजन सुरू होई. तेव्हा हा छोटा गणपतीही आपल्या पायातील वाळ्यांच्या आवाजाने दुड्दुड नृत्य करीत व टाळ्यांच्या गजरात बोबडया बोलाने "लाम किष्ण हाली ’ असे म्हणे, तोच त्याला पंतांनी घेऊन कुरवाळावे असे नित्यशः चाले. तैशी दशेची वाट न पाहतां । वयसेचिया गावा न येता । बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ॥ ही ज्ञानेश्र्वर महाराजांची ओवी डोळ्यांपुढे उभी राहते. पूर्व संस्काराने ज्याच्या बुद्धीवर हरिभक्तीचे द्दढतर संस्कार उमटलेले आहेत त्याला अशा अलौकिक बुद्धीची काय किंमत ? पंतांनी स्नान केले की हा स्नान करायला जाई. त्यांनी संध्या केली की, याची सुरु होई. त्यांच्या पूजेच्या अगोदर हा शंख घंटा काढून तयार. जसा काही मुलगा मोठा देवभक्त ! हे त्याने कौतुक पाहून आजा-आजीच्या नेत्रांतून प्रेमाश्रूंचे लोट वाहात व हा बाळ आपल्या बापापेक्षा सवाई निघून आपल्या कुळाचे यश दिगंत गाजवील, असे त्यांना नित्य वाटे.

« PreviousChapter ListNext »