Bookstruck

अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील.

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१८५२
अजून तरी त्याचे नाम घ्या.
तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील.
या वर्षी पतांनी श्रींना गावच्या शाळेत घातले. अण्णा खर्शीकर नावाचे मास्तर ही शाळा चालवीत असत. गावातील पुष्कळ मुले या शाळेत येत. गुरूजींनी धडा द्यावा, आणि श्रींनी तो तत्काळ म्हणून दाखवावा असे चाले. नंतर "आज एवढे पुरे, उद्या पुढे सांगेन ’ असे आण्णांनी सांगून श्रींना गप्प बसवावे. अशा रीतीने बाळबोध व मोडी लिहिणे आणि वाचणे, बेरीज, वजाबाकी इत्यादि गणित आणि हिशोब करणे, सुंदर व घोटीव अक्षर काढणे, वगैरे अण्णांजवळ होती तेवढी सर्व विद्या संपली. तरी श्रींचे ’मला पुढे सांगा ’ हे चालूच राहिले. तेव्हा अण्णा म्हणाले, "अरे माझी विद्या संपली, मग काय विचारता ! श्रींनी रोजशाळेमधे जावे, मुलांना बाहेर काढावे, गोटया, विटी-दांडू खेळावे, पोहायला जावे. शाळेत असताना अक्षर गिरवण्याच्या वेळी श्री इतर मुलांना ’श्रीराम समर्थ ’ असा कित्ता काढून देत आणि तो सर्वांना गिरवायला सांगत. मुलेसुद्धा मोठया हौसेने ’श्रीराम समर्थ ’ असे काढीत बसायची. अण्णांना हे बिलकुल पसंत नसे सर्व मुले खेळायला जमली म्हणजे प्रथम श्री त्यांना मोठयाने श्रीरामाचे भजन करायला लावायचे. मधून मधून भजन आणि मधूनमधून खेळ असा प्रकार चाले. एकदा शाळा भरल्यावर अण्णा मध्येच काही कामासाठी घरी गेले. बापू फडतरे नावाचा श्रींचा एक मोठा जिवलग मित्र होता, तो मुलांना म्हणाला ’आपण श्रीरामाचे भजन करू या ’ त्याबरोबर सर्व मुलांनी धडे घोकण्याऐवजी सर्व मुले मोठयाने "श्रीराम, श्रीराम " असे म्हणू लागली. अण्णा परत येऊन पाहतात तो हा प्रकार, त्यांना फार राग आला." ते म्हणाले "गणूने तुम्हाला हे खूळ शिकविले आहे नां ! थांबा काढतो एकेकाची भक्ती ’ असे बोलून प्रत्येक मुलाला जोराने एकेक छडी मारली. पथापि मुलांची ही मनोवृत्ती पाहून इतः पर या गावात राहण्यात अर्थ नाही असा विचार करून अण्णा दुस‍र्या दिवशीच आपले सामान गाडीत भरून दुस‍र्या गावी जायला निघाले. गाडी गावाच्या बाहेर गेल्यावर श्रींनी त्यांना गाठले, आणि म्हणाले " अण्णा, रामरायाचा द्वेष करून आजपर्यंत कुणाचे कल्याण झाले नाही. अजून तरी त्याचे नाम घ्या, तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील." हे गोड प्रेमळ शब्द ऐकून अण्णांच्या डोळ्यांत पाणी आले आणि ते "श्रीराम श्रीराम " असे म्हणत असता गाडी पुढे निघून गेली. श्रींची शाळा सुटली तरी इतर उपदूव्याप सुटले नव्हते. दुस‍र्या शाळेची सोय नसल्याने श्री घरीच होते, परंतु घरी तरी श्री स्वस्थ कसे बसणार ! आता सर्व मुले श्रींना ’गणुबुवा ’ म्हणू लागली.

« PreviousChapter ListNext »