Bookstruck

"चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस."

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१८७१
"चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस."
पंढरपूरहून परत आल्यावर काही दिवसांनी श्री परत आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी जाण्याची भाषा बोलू लागले. आईने जेव्हा हे ऐकले तेव्हा ती म्हणाली, "गणू, तुला काय वाटेल ते कर, पण जिकडे जाशील तिकडे आपल्या बायकोला घेऊन जा. तिला घरी ठेवून तू एकटा जाऊ नकोस." सरस्वतीने हे ऐकले. खरं म्हणजे सरस्वतीलादेखील श्रींच्या संगतीची खरी चटक लागली होती म्हणून ते जायला निघतील तेव्हा आपण त्यांच्या बरोबर जायचे असा तिने मनाशी निश्र्चय केला. श्री अनेक प्रसंगी श्रीतुकामाईच्या गोष्टी सांगत त्या ऐकून त्यांचे दर्शन घ्यायला येहळेगावला आपणही श्रींबरोबर जावे असे तिला मनापासून वाटे. श्रींचे ज्यावेळी तिकडे जायचे ठयले तेव्हा श्रींनी तिची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण ती घरी राहायला बिलकूल तयार होईना. प्रवासाच्या कष्टांचे आणि वाटेमध्ये येणार्‍या संकटांचे श्रींनी पुष्कळ वर्णन करून सांगितले. पण तिचा निश्र्चय ढळेना.
शेवटी एके दिवशी मध्यरात्री उठून श्री ऐकदम जाण्यास निघाले. त्यांच्या मागोमाग सरस्वतीपण तशीच निघाली. श्री तिच्यावर रागावले पण ती गप्पच राहिलि. श्री पळू लागले, तीही त्यांच्या मागोमाग पळू राहिली. शेवटी श्रींनी आपल्या पायानी मागच्या मागे तिला दगड फेकून मारण्यास सुरुवात केली, अर्थात ते दगड श्री अशा खुबीने मारीत की ते तिच्या अगदी जवळूत जावेत, पण तिला मात्र लागू नयेत. तरी देखील सरस्वती निर्भयपणे त्यांच्यामागे पळतच राहिली. श्री काही वेळाने थांबले व प्रसन्न होऊन सरस्वतीला म्हणाले, "चल, तू आता तुकामाईच्या दर्शनाला खरी लायक आहेस." नंतर सावकाशपणे मजल दरमजल करीत श्री येहळेगावला पोहोचले. सुदैवाने त्यावेळी श्रीतुकामाई घरीच होते. त्यांना पाहिल्याबरोबर श्रींनी साष्टांग नमस्कार घातला. लगेच सरस्वतीने नमस्कार केला. त्या दोघांना पाहून तुकामाईंना इतका आनंद झाला की त्यांनी मुद्दाम साखर मागवून घेतली आणि आपल्या हाताने दोघांच्या तोंडात घातली. त्यांनी त्या दोघांना आठ दिवस ठेवून घेतले आणि कधी कोणाचे केले नव्हते असे श्रींचे विशेषतः सुनबाईंचे कौतुक केले. तेथून निघायच्या दिवशी सरस्वती पाया पडायला आली त्यावेळी तुकामाईने तिला सहज विचारले, "माय, तुला काय पाहिजे ?" ती म्हणाली, "यांच्यासारखा मुलगा मला व्हावा एवढीच माझी इच्छा आहे." हे तिचे मागणे ऐकून गुरु व शिष्य दोघेही हंसले. श्रीतुकामाई "तथास्तु " असे बोलले आणि खणा नारळांनी तिची ओटी भरली व दोघांना मोठया प्रेमाने निरोप दिला.

« PreviousChapter ListNext »