Bookstruck

एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१८९०-९१
एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र व
आकर्षण कोण असेल तर ते ’श्री ’ च होते.
श्रीरामरायाचे मंदिर बांधून तयार झाल्यावर समारंभाच्या आमंत्रणाची निरनिराळ्या गांवी पत्रे गेली. स्थापनेच्या सात दिवस अगोदर श्रींनी स्वतः देवापुढे नारळ ठेवून भजन व नामस्मरण यांचा सप्ताह आरंभ केला. कामावर येणार्‍या लोकांनाच नव्हे तर सबंध गावच्या लोकांना जेवण्यासाठी आठ दिवस मुक्त द्वार ठेवले. रोजभजन, नामस्मरण, कीर्तन, पुराण व भोजन यांची गर्दी उडून गेली. शेवटी स्थापनेचा दिवस ( सन १८९१, शके १८१३ ) उगवला. सबंध दिवसभर गोंदवले गांव आनंदाने उजळून निघाले होते. मंदिरामध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना अत्यंत समारंभाने झाली. त्या प्रित्यर्थ श्रींनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. काशी, प्रयाग, अयोध्या, पुणे, वाई, सातारा, कर्‍हाड, हुबळी, धारवाड वगैरे ठिकाणाहून मोठमोठे विद्वान, पंडित, वैदिक ब्राह्यण समारंभासाठी मुद्दाम आले होते. इतकेच नव्हे तर आसपासच्या गावांमधले त्यांच्या कुटुंबाला पूर्वीपासून ओळखणारे सर्व लोक त्या दिवशी गोंदवल्यास आले होते. तो दिवस श्रीरामरायाच्या प्रतिष्ठापनेचा खरा, पण एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र व आकर्षण कोण असेल तर ते श्रीच होते. आठ दिवस त्यांच्या भोवती सदोदित माणसांचा गराडा पडलेला असे. ते प्रत्येकाशी अत्यंत प्रेमळपणाने वागून, आपल्याकडे आलेल्या मंडळींचे ईश्वरप्राप्तीकडे कसे लक्ष लागेल इकडे लक्ष ठेवून सर्व हालचाल करीत होते. इतर वेळी ते सुरेख दिसतच; परंतु स्थापनेच्या दिवशी त्यांचे तेज अगदी ओसंडून वाहत होते. कपाळाला मोठे केशरी गंध, गळ्यामध्ये नवी तुळशीची माळा, अंगामध्ये नवी जरीची भगवी कफनी आणि पायांमध्ये नव्या खडावा घातलेले श्रीमहाराज, सिंहासनावर आरुढ झालेल्या श्रीरामरायाला डोळे भरून पाहण्यासाठी आपल्या आईने यावे म्हणून तिला बोलावण्यास जेव्हा स्वतः गेले त्या वेळी त्यांची ती आनंदमय मनोहर मूर्ती पाहून वात्सल्यप्रेमाने आईच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तिने त्यांच्यावरून मीठ-मोहर्‍या ओवाळून टाकल्या. आमंत्रणाने बोलावलेल्या प्रत्येकाला श्रींनी कांही ना कांही तरी दिले. प्रत्येक विद्वान पंडिताला एकेक रेशमी वस्त्र व एकेक होन दिला. प्रत्येक ऋणानुबंधीला एकेक उपरणे दिले. मंदिर बांधणार्‍या प्रत्येक कामगाराला एकेक धोतर, मुंडासे व पाच रुपये दिले. समारंभाला आलेल्या प्रत्येक सुवासिनीची खणा-नारळानी ओटी भरली आणि अन्नदानाला तर मुळी सीमाच राहिली नाही. शेवटच्या दिवशी सार्‍या दिवसभर लोकांच्या पंगतीवर पंगती उठत होत्या. त्या एके दिवशी जवळ जवळ १० हजार लोक जेवून तृप्त झाले. वनवासाहून आल्यावर श्रीरामरायाला राज्याभिषेक झाला त्या वेळी श्रीरामरायाने जसा पोषाख केला असावा तसा त्या दिवशी रात्री त्याला घातला. व त्याच्यासमोर भजनाला उभे राहून "छत्र सिंहासनी अयोध्येचा राजा । नांदतसे माझा मायबाप ॥ या अभंगाने श्रींनी भजनास सुरूवात केली. सुरूवातीपासून भजनास रंग चढून सर्वांच्या मनोवृत्ती तन्मय झाल्या. श्रीरामरायाच्या मुखाकडे पहात अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी श्रींनी "श्रीरामचंद्रा करुणासमुद्रा । ध्यातो तुझी राजसयोगमुद्रा " हे दोन चरण म्हंटले इतक्यात ओंजळीमध्ये श्रीरामरायाच्या गळातील सुंदर गुलाबाची फुले येऊन पडली, श्रींनी रामरायाला साष्टांग नमस्कार घातला व फुले प्रसाद म्हणून सर्वांना वाटली.

« PreviousChapter ListNext »