Bookstruck

मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत.

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
१९०७
मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत
जून १९०५ साली काशीस जाण्यास निघालेले श्री बरोबरच्या सर्व मंडळींसह गोंदवल्यास परत आले. सर्वांना अतिशय आनंद झाला. यात्रेचे उद्यापन थाटाने पार पडले. ‘गोंदवलेकर महाराज’ म्हणून श्रींची कीर्ती महाराष्ट्रात व कर्नाककात खूप पसरली. त्यामुळे श्रींच्या दर्शनास येणार्‍यांची संख्या फार वाढली. यांमध्ये विद्बान शास्त्री , मोठे अधिकारी, तपस्वी, योगसाधनी, श्रीमंत, कुलवान तसेच रोगी, दरिद्री, गांजलेले, दुष्ट, व्यसनी अशीही माणसे होती. समाजातील सर्व थरांमध्ये त्यांचे शिष्य पसरलेले असल्याने गोंदवले येथे जणू काय परमार्थाचा बाजारच भरला आहे असे वाटे. नवीन येणार्‍या माणसाला येथे एक विशेष गोष्ट दिसे, ती म्हणजे प्रत्येक मनुष्य नाम घेत आहे. मंदिरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये, अंगनामध्ये, रस्त्यामध्ये, शेतामध्ये, मळ्यामध्ये, गोशाळेत जिकडे तिकडे नामाचा घोष ऐकायला येई. मनुष्याला जिंवत राहण्यास हवेची जितकी जरुरी आहे तितकीच जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे, ही गोष्ट गोंदवल्यास येणार्‍या प्रत्येक मनुष्यास श्री पटवून देत. प्रत्येक जण तेथे काही तरी संकल्प करुन जप करीत असे. गोंदवल्याच्या राममंदिराला परमार्थाच्या विद्यालयाचे स्वरुप प्राप्त होऊन श्री त्याचे कुलगुरु शोभू लागले. सर्वांचे लक्ष श्रींकडे असे तसे श्रींचेही लक्ष सर्वांच्याकडे असे. मंदिरामध्ये रोज उत्सवाचे वातावरण असे. सर्व माणसे नीतीने व मर्यादेने वागत. रामनाम हे सर्वांचे साधान असे. श्रींच्या वागण्यामध्ये फार खुबी होती, अगदी प्रत्येक माणसाला वाटे की, श्रींचे आपल्यावर प्रेम आहे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागले असता जन्माचे कल्याण झालेच पाहिजे ही तर त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांच्या बोलण्यात अतिशय आर्जव व नम्रता होती. प्रत्येकाचे अंतरंग जाणून श्री त्याच्याशी बोलत. प्रत्येकाचा दोष ते समजावून देत पण त्याचा कधी अपमान होत नसे. श्रींच्या संगतीत काहीजण उत्तम साधक झाले. भगवंताचे नाम ते जितक्या मुक्तहस्ताने वाटीत, तितक्याच मुक्त हस्ताने श्री अन्नदान करीत. अन्नाने बुद्धी तयार होते म्हणून प्रेमाने केलेला आणि प्रेमाने वाढलेला प्रसाद (भात, भाकरी व आमटी) मंदिरातील प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे इकडे त्यांचे लक्ष असे. पुष्कळ वेळा श्री मंडळींना जेवायला बसत. पूर्वी गोंदवल्यास बाजार भरत नसे. लोकांना म्हसवड किंवा दहिवडीला जावे लागे. श्रींनी दर गुरुवारी बाजार भरविण्यास आरंभ केला. बाजारासाठी आलेल्या प्रत्येकाला प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका असे सांगत व नंतर गावच्या सर्व मंडळींना त्या दिवशी प्रसाद घेण्यास बोलावीत. आपल्या गावात कोणी उपाशी राहू नये असे त्यांचे ब्रीद होते. त्यामुळे गरीब स्त्री-पुरुषांना श्री मायबाप वाटत. चैत्र शुद्ध पौर्णिमेस नामसप्ताह असे. माघ महिन्यात दासनवमीला भिक्षा होई.आषादी,कार्तिकी एकादशीला मोठे भजन होई. पंढरपूरला जाणारे पुष्कळ वारकरी व त्यांच्या दिंड्या मंदिरामध्ये मुक्काम करीत. श्री सर्वांच्या मोठ्या प्रेमाने परामर्ष घेत. "जयजय श्रीराम, जयजय श्रीराम" असे जेवायच्या वेळी मोठ्याने म्हणण्याचा प्रघात श्रींनी सुरु केला. त्यामुळे नंतर कोणतेही काम करताना सर्वजण भगवंताचे नाम घेऊ लागले. रोज नवीन मंडळी गोंदवल्यास येऊ लागली. तर जुनी मंडळी गोंदवल्याहून परत जाताना श्री प्रत्येकाला शिदोरी बांधून देत. सुवासिनी जायला निघाल्या म्हणजे प्रत्येकीची खणा-नारळांनी ओटी भरीत. मंदिरामध्ये श्रीराम उभा असणारा केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भावनेने श्री वागत व त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येकाला तशाच भावनेने वागवण्याचा मनापासून उपदेश करीत जो जो मनुष्य त्यांच्याकडे येई. त्याला मोठ्या प्रेमाने सांगत, " अरे, माझ्या रामाला एकदा डोळे भरुन पहा व नंतर घरी जा. " प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना रामरायाची इच्छा काम करीत असल्याने दिसे. सर्व काही राम करतो, खरे कर्तेपण रामाचे हा श्रींच्या उपदेशाचा गाभा असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला ते रामाला पुढे करुन आपण नाहीसे होत.

« PreviousChapter ListNext »