लेख: मानवी स्पंज आणि स्प्रिंग!

तुम्ही दु:खात आणि ताणतणावात असाल तर शक्यतो कुणाला सांगू नका. कारण दु:खावर खरी सहानुभूती देणारे तुम्हाला भेटणार नाहीत किंवा खूपच कमी भेटतील. उलट तुम्ही दु:खी मन:स्थितीत किंवा समस्यांनी वेढलेले आहात हे पाहून तुम्हाला आणखी त्रास देण्याचा प्रयत्न जरूर होईल. त्या मन:स्थितीचा फायदा घेतला जाईल. उदाहरण द्यायचे झाले तर आधीच चोळामोळा झालेला कागद रस्त्यावर पडलेला असला तर त्याला आणखी पायाखाली दाबून किंवा आणखी चोळामोळा करणारे आणि समुद्रात फेकून देणारे लोक जास्त असतील. क्वचित असा एखादा असतो जो त्या कागदाला हातात घेऊन त्याला उलगडून पुन्हा सरळ करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कागदात काय लिहिले आहे ते वाचण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याला पुन्हा त्याच्या हरवलेल्या पुस्तकात ठेवतो. रस्त्यात एखादा स्प्रिंग आणि स्पंज सापडला तर जरूर कुणीतरी त्याला दाबून बघतो. रस्त्यात दगड असला तरी कुणी सहसा त्याच्या वाटेला जात नाही!