Bookstruck

सद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा!

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »


तुम्ही संवेदनशील आणि भिडस्त आहात?
तुम्हीं शांत स्वभावाचे आणि मितभाषी आहात?
सालस आणि आज्ञाधारक आहात?
आणि त्यासाठी तुमचे कौतुक होत आहे?
तर मग आजच सावध व्हा!
ते कौतुक यासाठी आहे की तुम्ही तसेच सद्गुणाचे पुतळे राहावे म्हणजे जग तुमचे शोषण करू शकेल!
तुमच्या अंगात ठाण मांडून बसलेला हा सद्गुणाचा पुतळा निर्धाराच्या घट्ट दोरखंडाने बांधा, एका भक्कम लोखंडी पेटीत टाका, पेटीला भलेमोठे इच्छाशक्तीचे लोखंडी कुलूप लावून ती पेटी मिसाईलला बांधून हेलिकॉप्टरमधून समुद्राच्या मध्यभागी खोल तळाशी भिडेल इतक्या जोरात फेकून द्या आणि चाबी वितळवून टाका. आणि मग समुद्राच्या खवळलेल्या लाटांची प्रेरणा घेऊन बिनधास्तपणा, स्पष्टवक्तेपणा, बेफिकिरी, डावपेच आणि निगरगट्टपणा यांचा अंगीकार करा.
आजचे घोर कलियुग सद्गुणांच्या पुतळ्यांसाठी बनलेले नाही आणि ते मध्यम मार्ग सुद्धा स्वीकारू देत नाही.
एक तर तुम्ही कुणाचे शोषण करा, नाहीतर मग स्वत: तरी शोषित व्हा.
कुणाचा तरी बळी घ्या, नाहीतर तुमचा बळी जाईल.
कुणालातरी दबावात ठेवा नाहीतर तुम्हाला कुणीतरी दबावात ठेवेल.
कुणालातरी खाली खेचा, नाहीतर दुसरा कुणीतरी तुम्हाला खाली खेचून पाडेल.
योग्य वेळ आली की समोरच्याला खडे बोल सुनावून मोकळे व्हा नाहीतर तुम्हाला गृहीत धरले जाईल, तुमचे मौन ही तुमची मूक संमती मानली जाईल. स्पष्ट बोला नाहीतर कष्ट झेला. प्रत्येक "अरे" ला "कारे" करा!
पाणी गळ्यापर्यंत येण्याची वाट बघू नका नाहीतर ते पुढे नाकातोंडात जाऊन श्वास घेणे मुश्कील करेल.
« PreviousChapter ListNext »