Bookstruck

सरस्वतीची झाली नंदा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

मेरुपर्वतावर पुष्कर तीर्थी सरस्वती नदी वाहते. तिथे तिला नंदा असेही म्हणतात. त्याची कथा अशी आहे - पूर्वी प्रभंजन नावाचा राजा होता. तो पुष्कर वनात शिकारीसाठी आला असता आपल्या पाडसाला दूध पाजणार्‍या एका हरिणीची त्याने शिकार केली. हरिणीच्या शापाने तो पशुयोनीत जाऊन वाघाच्या जन्माला आला. आजपासून शंभर वर्षांनी नंदा नावाच्या गायीशी तुझे बोलणे होईल व हा शाप संपेल, असे हरिणी म्हणाली. हा वाघ मोठा भयंकर असून रानातील येणार्‍या जाणार्‍या प्राण्यांची हिंसा करी. शंभर वर्षांनी गायींचा एक मोठा कळप तेथे वास्तव्यास आला. त्यातील नंदा नावाची एक गाय भटकत भटकत वाघाजवळ आली. वाघ तिला मारून खाण्याचा विचार करू लागला. घरी असलेल्या वासराच्या आठवणीने ती व्याकूळ झाली. त्याला एकदा दूध पाजून, प्रेमाने चाटून आपल्या सख्यांच्या स्वाधीन करून मग मी स्वतः तुझ्याकडे येईन व मग तू मला खा, अशी नंदाने विनंती केली. वाघाने दयाळू होऊन ती मान्य केली. ठरल्याप्रमाणे ती परत निघाली, तेव्हा इतर गायींनी तिला आत्मरक्षणासाठी खोटे बोलल्यास पाप नाही वगैरे सांगितले. पण सत्य हेच उत्तम तप आहे असे म्हणून नंदा वाघाकडे निघाली. तिच्या पाठोपाठ तिचा बछडाही आला. त्यांना पाहून गायीचे ते सत्याचे वागणे पाहून वाघाने तिला मारण्याचा विचार सोडला. उलट आजपर्यंत आपण केलेल्या हत्यांच्या पाताळातून मुक्त होण्यासाठी उपाय विचारला. गायीने त्याला कलीयुगाचा जो धर्म दान त्याची आठवण देऊन सर्वांना तू अहिंसेचे दान दे असे सांगितले. वाघाने तिला आपल्या पूर्वजन्मीची हकिगत सांगितली व तिचे नाव विचारले. नंदा नाव ऐकताच प्रभंजनाची शापातून मुक्तता झाली. त्या वेळी सत्यवचनी नंदेचे दर्शन घेण्यासाठी साक्षात यमधर्म तेथे आला व संतुष्ट होऊन "वर माग' म्हणाला. ही सरस्वती नदी आजपासून नंदा या नावाने ओळखली जावी व हे स्थान मुलींना ’धर्म प्रदान करणारे तीर्थ व्हावे' असा वर तिने मागितला. तिला तिच्या वासरासहित उत्तम पद प्राप्त झाले.

« PreviousChapter ListNext »