Bookstruck

श्रीवत्सलांच्छनाची कथा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ही कथा वैशंपायन ऋषींनी राजा जन्मेजयाला भागवत पुराणात सांगितली आहे. पूर्वी एकदा सर्व ऋषींमध्ये असा वाद निर्माण झाला, की ब्रह्मा, विष्णू व महेश या तिघांत सर्वांत सात्त्विक कोण? प्रत्येक जण आपापल्या प्रिय देवतेचे नाव घेऊ लागला. शेवटी याचा निर्णय करण्यासाठी ब्रह्मदेवपुत्र भृगू ऋषी यांनी प्रत्येक देवाकडे जाऊन त्याला लत्ताप्रहार करण्याचे ठरले. प्रथम भृगू ब्रह्मदेवाकडे गेले व लाथ मारणार, तोच ब्रह्मदेवाच्या दूतांनी त्यांना मागे ओढले व घालवून दिले. नंतर भृगू शिवलोकी गेले. आता महादेवाच्या जवळ जाऊन लाथ मारणार इतक्‍यात शिवगणांनी त्यांना ओढून बाजूला नेले. मग भृगू ऋषी क्षीरसागरी भगवान विष्णूंकडे गेले. विष्णू शेषशय्येवर निजले होते. लक्ष्मीने त्यांना बसायला सांगितले; पण तसे न करता ते रागारागाने विष्णूंना जागे कर म्हणू लागले."झोपमोड करणे हे पाप आहे," असे लक्ष्मीने म्हणताच भृगू ऋषी जास्तच रागावले व विष्णूंच्या छातीवरील पीतांबर दूर सारून त्यांच्या हृदयावर त्यांनी जोराने एक लाथ मारली. त्याबरोबर जागे होऊन त्यांनी रागावलेल्या भृगूला पाहिले; पण आपण न रागवता मोठ्या प्रेमाने त्यांना ऋषींना आसनावर बसवले व म्हणाले,"दुष्टांचा संहार करण्याच्या कष्टाने मी शिणलो होतो. तुमच्या लत्ताप्रहाराने मला बरेच वाटले. माझ्या कठीण हृदयावर लाथ मारल्याने तुमचा पाय दुखावला असेल. म्हणून मी तुमचे पाय चेपतो," हे ऐकून, विष्णूची ती शांत वृत्ती पाहून भृगूंना पश्‍चात्ताप झाला; पण विष्णू म्हणाले,"तुमचे हे पदलांच्छन मी माझ्या हृदयावर अभिमानाने मिरवीन व त्याला मी श्रीवत्सलांच्छन म्हणीन."
शंकराचे वाहन नंदी याचा खूर लागून पडलेल्या व्रणाला वत्सलांच्छन म्हणतात; तसेच श्रीवत्स या श्राद्धदेवाच्या मुलाने लाथ मारली म्हणून श्रीवत्सलांच्छन म्हणतात, अशाही कथा ब्रह्मपुराणात आहेत.

« PreviousChapter ListNext »