Bookstruck

रेणुकेचा जन्म

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

ईक्ष्वाकू वंशात रेणू या नावाचा महापराक्रमी राजा होऊन गेला. भागीरथीच्या काठी कान्यकुब्ज शहरी राहून तो कारभार पाहात असे. पुत्रप्राप्तीसाठी त्याने शंकराची भक्ती केली. तेव्हा प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला एक सर्वगुणसंपन्न अशी मुलगी व नंतर एक मुलगा होईल असा वर दिला. मग राजाने अत्री, वसिष्ठ इ. ऋषींना बोलावून यज्ञ आरंभला. पूर्णाहुती झाल्यावर यज्ञातून एक सर्वांगसुंदर कन्या निघाली. रेणू राजाने तिचे नाव रेणुका असे ठेवले. ही रेणुका म्हणजे पार्वती व कश्‍यप पत्नी अदिती या दोघींचा अवतार होय. याची कथा अशी - एकदा दैत्यांच्या त्रासाला कंटाळून सर्व देव विष्णूकडे गेले. त्यांनी विष्णूला पूर्वी त्यांनी हिरण्याक्षाचे वेळी घेतलेला वराहावतार, हिरण्यकश्‍यपूच्या वेळचा नृसिंहावतार व बळीच्या वेळचा वामनावतार यांची आठवण करून देऊन पुन्हा अवतार घेण्यासाठी विनंती केली.

प्रसन्न होऊन विष्णू म्हणाले, "या वेळी अदितीचे उदरी मी पूर्णरूपाने अवतार घेणार आहे, तेव्हा तिने ते तेज सहन करण्याची तयारी करावी." हा निरोप घेऊन देव अदितीकडे गेले व त्यांनी आपापले तेज अदितीच्या गर्भासाठी दिले; पण ते पुरेसे नाही असे समजून तिने पार्वतीची तपश्‍चर्या सुरू केली. पार्वती प्रसन्न झाल्यावर अदिती म्हणाली, "विष्णू माझ्या उदरी अवतार घेणार आहेत, त्यांचे तेज सहन करण्यासाठी तू माझ्या शरीरात वास कर." पार्वती याला तयार झाली; पण शंकरांनी तिचे पती कश्‍यप यांच्या शरीरात वास करावा याची तजवीज करण्यास सांगितले. मग अदितीने शंकरांना प्रसन्न करून घेऊन वर मागितला, की आपण व कश्‍यप एकरूप होऊन माझा स्वीकार करावा. अशाप्रकारे शंकर व कश्‍यप तसेच पार्वती व अदिती एकरूप झाले. रेणू राजाच्या यज्ञातून बाहेर आलेली मुलगी म्हणजे अदिती व कश्‍यप यांची मुलगी जी पार्वती व अदिती या दोघींचा अवतार होय.

« PreviousChapter ListNext »