Bookstruck

सौभरी चरित्र

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सौभरी नावाचे ऋषी जलात राहून तपस्या करीत होते. त्याच जलात अनेक मासे होते. सौभरी ऋषींचे नकळत या मत्स्यपरिवाराकडे लक्ष वेधले गेले. त्यांच्या रमणीय क्रीडा पाहून त्यांना वाटले, "एवढ्या कनिष्ठ योनीत जन्माला येऊनही हे सगळे आनंदात आहेत. म्हणजे गृहस्थाश्रमात जास्त सुख दिसते." अशा प्रकारे आपणही गृहस्थ धर्म स्वीकारावा म्हणून तो राजा मांधाताकडे गेला व त्याच्या अनेक कन्यांपैकी एकीशी लग्न करण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली. त्याचे ते वार्धक्‍याकडे झुकल्यासारखे शरीर पाहून मांधाता म्हणाला, "कन्या ज्याला पसंत करेल त्यालाच ती देण्याची आमची रीत आहे. तरी तू माझ्या मुलींना भेट." अंतःपुरात प्रवेशताना सौभरींनी योगबलाने आपले शरीर तरुण व रूपसुंदर बनवले. सर्वच कन्यांनी त्यांना पसंत केल्यामुळे राजाने सर्व कन्या त्याला विवाह करून अर्पण केल्या.

सौभरी ऋषीने सर्व पत्नींसाठी वेगळा महाल बनवला व मोठ्या आनंदाने गृहस्थाश्रम चालू केला. एके दिवशी राजा मांधाता मुलींना भेटायला गेला. तेथील सर्व ऐश्‍वर्य पाहून त्याने एका मुलीला, "सर्व काही कुशल आहे ना? महर्षी सौरभ तुझ्यावर प्रेम करतात ना?" असे विचारले. यावर ती म्हणाली, "माझे सर्व छान आहे; पण ऋषी माझ्या इतर बहिणींकडे जात नसल्याने त्या बिचार्‍या दुःखी असतील." मग राजाने आपल्या सर्व कन्यांची चौकशी केली. सर्वांनी वरीलप्रमाणेच उत्तर दिले. राजाला सौभरी ऋषींचे योगमाहात्म्य समजले. अत्यंत नम्र भावाने तो त्यांना भेटला. यथावकाश सौभरी ऋषींना अनेक पुत्र झाले. आपल्या पत्नी व मुले यात ते अनेक वर्षे रमून गेले. पण एकदा त्यांना वाटू लागले, "माझ्या मोहाचा बराच विस्तार झाला. हा मोह संपणार तरी केव्हा? मृत्यूपर्यंतआपले मनोरथ असेच चालू राहणार आणि मग आपण परमार्थ कसा करणार?" या विचारांनी अस्वस्थ होऊन सौभरींनी आपले पुत्र, घर, धन इत्यादींचा त्याग केला व आपल्या पत्नींसह पुन्हा वनात जाऊन धर्माचेअनुष्ठान, तप इ. करून रागद्वेषावर विजय मिळवून संन्यासाश्रमात प्रवेश केला.

« PreviousChapter ListNext »