Bookstruck

पराशर कथा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

प्राचीन काळी रुधिर व इतर राक्षसांनी मिळून वसिष्ठांच्या शंभर पुत्रांचा नाश केला. वसिष्ठ अरुंधतीसह शोकमग्न झाले व आपले सर्व कुल नष्ट झाले म्हणून देहत्याग करू लागले. त्यांचा एक पुत्र शक्ती याची पत्नीअदृश्‍यंती त्या वेळी गर्भवती होती. आपल्या नातवासाठी तरी आपण जिवंत राहावे अशी तिने विनंती केली. पुढे यथावकाश तिने पराशर नावाच्या पुत्रास जन्म दिला. अदृश्‍यंतीने त्याचे नीट संगोपन केले. आपली दुःखीकष्टी माता पाहून एकदा पराशराने तिला दुःखाचे कारण विचारले. आपल्या वडिलांना राक्षसांनी मारल्यामुळे सर्व जण दुःखी आहेत, हे समजताच पराशराने शिवाचे तप करून आपल्या मृत पित्यासव बंधूस पाहण्याचे ठरविले. त्याप्रमाणे शिवलिंग तयार करून "रुद्र, रुद्र" असा जप त्याने सुरू केला. शिवांनी प्रसन्न होऊन त्याला दिव्यदृष्टी दिली. त्यामुळे पराशरांना शंकराचे त्यांच्या दिव्य गणांसह, ब्रह्मा,विष्णू,इंद्र यांच्यासह दर्शन झाले. तसेच दिव्यलोकात त्याला आपल्या पित्याचे, चुलत्यांचे दर्शन झाले. वसिष्ठ संतुष्ट होऊन पराशरास म्हणाले, "तू माझ्या संपूर्ण वंशाला तारले आहेस." भगवान शंकराच्या वराने पराशर शक्तिमान झाला. त्याने मंत्रद्वारा सर्व राक्षसकुलाचा नाश केला. त्या वेळी वसिष्ठांनी त्याला उपदेश केला, "तुझ्या पित्याचा अंत झाला, यात सर्व राक्षसांचा दोष नाही. तरी तू आताक्रोध आवर व निरपराध राक्षसांना मारू नकोस." आपल्या पितामहांचे बोलणे ऐकून पराशराने राक्षसांचा संहार थांबवला. याच वेळी ब्रह्मदेवपुत्र पुलस्त्यमुनी तेथे आले. वसिष्ठांच्या शब्दाला मान दिल्यामुळेराशरावर प्रसन्न होऊन त्यांनी त्याला सर्व शास्त्रांचे ज्ञान होईल, पुराणसंहिता सांगणारा तो एक महान ऋषी होईल, असा आशीर्वाद दिला.याप्रमाणे वसिष्ठ व पुलस्त्य यांच्या कृपेने पराशराने विष्णुपुराणाची रचना केली.

« PreviousChapter ListNext »