Bookstruck

शिवांचे अवतार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

शौनकाने एकदा सूतास शंकराच्या अवतारासंबंधी विचारले. तेव्हा त्यांनी शिवाच्या पाच अवताराची कथा सांगितली, ती अशी - सर्वव्यापी शिवांनी वेगवेगळ्या कल्पांत असंख्य अवतार घेतले. श्‍वेतलोहित नावाच्या एकोणिसाव्या कल्पात शिवांचा सघोजात नावाचा अवतार झाला. तो त्यांचा प्रथम अवतार होय. ब्रह्मदेव परब्रह्माचे ध्यान करीत असता शुभ्र व लाल रंगाचा एक मुलगा त्यांना दिसू लागला. हा ब्रह्मरूपी परमेश्‍वर म्हणजेच सघोजत अवतार होय. त्याने ब्रह्मदेवांना ज्ञान व सृष्टिरचनेची शक्ती दिली. त्यानंतर रक्त नावाच्या विसाव्या कल्पात ब्रह्मदेवांनी लाल रंगाचे वस्त्र धारण केले होते. पुत्रकामनेने ध्यान करीत असता त्यांच्यासमोर लाल रंगाचे वस्त्र, माला, आभूषणे तसेच लाल डोळ्यांचा मुलगा प्रकटला. तो शिवांचा वामदेव अवतार होय. वामदेव हे अहंकाराचे अधिष्ठान आहे. त्यानंतर पीतवासा नावाच्या एकविसाव्या कल्पात शिव तत्पुरुष नावाने प्रकटला. तो गुणांचा आश्रयदाता तसेच योगमार्गाचा प्रवर्तक आहे. त्यानंतरच्या कल्पात ब्रह्मदेवांसमोर काळ्या शरीराचा, काळे वस्त्र ल्यालेला, काळेच चंदन, मुकुट वगैरे असलेला कुमार प्रकट झाला. त्याला शिवाचा अघोर अवतार म्हणतात. धर्मासाठी बुद्धीचा उपयोग करणारा हा अवतार आहे. विश्‍वरूप कल्पात शिव ईशान या नावाने प्रकट झाले. त्यांचा रंग तेजस्वी पांढरा व रूप सुंदर असून हा सर्वात मोठा अवतार मानला जातो. ईशानांनी ब्रह्मदेवाला सन्मार्गाचा उपदेश केला.

शिवांचा अर्धनारीनर अवतार विख्यात आहे. सृष्टिरचनेच्या प्रारंभी प्रजेचा विस्तार होत नव्हता. तेव्हा ब्रह्मदेव काळजीत पडले. त्या वेळी स्त्री निर्माण झाली नव्हती. बह्मदेवांनी शिवाचे ध्यान केले. शंकर तेव्हा अर्धनारीनररूपात प्रकट झाले. त्यांनी आपल्या शरीराच्या अर्ध्या भागापासून शिवादेवी निर्माण केली. ब्रह्मदेवांनी त्या परमशक्तीची प्रार्थना केल्यावर ती दक्ष प्रजापतीची कन्या म्हणून जन्माला आली त्यावेळेपासून या वेळात स्त्रीची कल्पना साकार झाली व स्त्री-पुरुषांपासून सृष्टीचा विकास झाला.

« PreviousChapter ListNext »