Bookstruck

हरिश्‍चंद्र

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

सूर्यवंशी राजा हरिश्‍चंद्र व राणी तारामती यांनी पुत्रप्राप्तीसाठी बरीच वर्षे वरुणदेवाची भक्ती केली. वरुणदेवाने प्रसन्न होऊन त्यांना पुत्रप्राप्तीचा वर दिला; पण सोबत एक अट घातली. वरुण म्हणाला, "हरिश्‍चंद्रा, मी मागेन तेव्हा तुझा पुत्र तू मला परत दिला पाहिजे.'' अट विचित्र असली तरी पुत्रप्राप्तीसाठी व्याकूळ झालेल्या राजा-राणीने मी मान्य केली. यथावकाश तारामतीस मुलगा झाला. त्याचे नाव रोहिदास ठेवण्यात आले. रोहिदासाच्या जन्मानंतर बारा दिवसांनी वरुण त्याला परत मागू लागला. तेव्हा हरिश्‍चंद्र वरुणाची करुणा भाकून म्हणाला, "मुलगा फारच लहान आहे. कृपया त्याला दात आल्यावर घेऊन जा.'' राजाची विनंती मान्य करून वरुणदेव परत गेला व सोळा महिन्यांनी परत येऊन मुलाला मागू लागला. पुन्हा वरुणाला हात जोडून राजा म्हणाला, "मुलाचा व्रतबंध होईपर्यंत त्याला येथे राहू द्यावे.'' पुन्हा वरुण निघून गेला व आठ वर्षांनी रोहिदासाचा व्रतबंध झाल्यावर परत आला. तेव्हा राजा चिंतातुर झाला व आता मुलाचे संरक्षण कोणत्या युक्तीने करावे याचा विचार करू लागला. तो वरुणाला म्हणाला, "हे वरुणा, मुलाचा व्रतबंध झाला आहे हे खरे, पण त्याला सर्व विद्या, युद्धशास्त्र यात निपुण करून मग तुला द्यावे असे मला वाटते. तरी तू कृपा करून अजून आठ वर्षांनी ये.'' ही विनंतीही मान्य करून वरुण परत गेला व रोहिदास सोळा वर्षांचा झाल्यावर आपल्या दूतांसह परत आला. त्याने दूतांना रोहिदासाला आणण्यासाठी पाठवले. पण या वेळी रोहिदासाने स्वतःच त्यांना अडवले व आपल्या शक्तिसामर्थ्याने त्यांना कैद करून टाकले. ते वृत्त समजताच संतप्त होऊन वरुण स्वतः रोहिदासाला आणण्यासाठी हरिश्‍चंद्राकडे जाऊ लागला. परंतु वाटेत रोहिदासाने त्याला रोखले व आपले धनुष्य ओढून आपला भयंकर बाण वरुणावर रोखला. एवढ्यावरच न थांबता तो म्हणाला, "एक पाऊल पुढे टाकशील तर शिरच्छेद करीन.'' त्याचे ते तेज, आक्रमक पवित्रा पाहून वरुण जागीच थबकला. याला नेणे दुरापास्त आहे हे त्याला समजून चुकले व रोहिदासाला न घेताच निघून गेला.
याप्रमाणे राजा हरिश्‍चंद्राने वरुणाला वेळोवेळी आज, उद्या करीत, गोड बोलून कालहरण करून रोहिदासालाच स्वसंरक्षणासाठी सज्ज केले व शेवटी रोहिदासाला परत नेणे अशक्‍य आहे हे त्याच्याकडूनच कळवले. अशा रीतीने ते संकट हरिश्‍चंद्राने टाळले होते

« PreviousChapter ListNext »