Bookstruck

श्‍वेतराजाचा उद्धार

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

त्रेतायुगात एक फार मोठे वन होते. एकदा अगस्ती मुनींनी त्या वनातील आश्रमात एक रात्र वास्तव्य केले. दुसर्‍या दिवशी सकाळी आश्रमाबाहेर रस्त्यात त्यांना एक प्रेत पडलेले दिसले. ते कुणाचे, असा विचार मुनी करत होते तेव्हाच एका विमानातून एक दिव्य मनुष्य तेथे आला व त्या प्रेताचे मांस खाऊ लागला. अगस्तींनी त्याला याचे कारण विचारले असता तो म्हणाला,"पूर्वकालात विदर्भदेशी माझा पिता वसुदेव राजा होता. मी त्यांचा मोठा मुलगा श्‍वेत व मला सुरथ नावाचा लहान भाऊ होता. पित्याच्या मृत्यूनंतर मी राजा झालो. बरीच वर्षे यशस्वीपणे राज्य केल्यावर मला वानप्रस्थाश्रमात जाऊन तपस्या कराविशी वाटू लागले, म्हणून सुरथाला राज्यावर बसवून मी वनात जाऊन उग्र तप केले. त्याच्या प्रभावाने मला ब्रह्मलोकाची प्राप्ती झाली. पण तेथे गेल्यावर मी सतत तहानभुकेने तळमळत असे. याचे कारण विचारल्यावर ब्रह्मदेव म्हणाले,"हा लोक भूकतहानविरहित असला तरी पृथ्वीवर काहीतरी दान केल्याखेरीज इथे काहीच खायला मिळत नाही. तू राजा असताना कुणाला भीकही दिली नाहीस, अतिथीला जेवण दिले नाहीस, म्हणून तुला तहानभुकेचे कष्ट पडतात. तुझे शरीर पृथ्वीवर पडलेले आहे, त्याचे मांस खाऊन तृप्त हो. तुझे शरीर अक्षय आहे. शंभर वर्षांनी अगस्तीमुनी तुझे हे संकट दूर करतील."
राजा श्‍वेताची ही कथा ऐकून अगस्तींनी आपली ओळख सांगितली. राजा त्यांना शरण आला. मुनींनी त्याची त्या घृणास्पद आहारापासून मुक्तता केली. आपला उद्धार केल्याबद्दल राजाने मुनींना एक दिव्य आभूषण कृतज्ञतापूर्वक भेट दिले. त्यांनी दान म्हणून त्याचा स्वीकार केला. पुढे श्रीराम अयोध्येस राज्य करीत असता एकदा अगस्तींच्या दर्शनासाठी गेले होते, तेव्हा त्यांनी ते विश्‍वकर्म्याने बनवलेले दिव्य आभूषण रामांना अर्पण केले. प्राप्त झालेल्या वस्तूचे पुन्हा दान देण्याने महान फलाची प्राप्ती होते, असे सांगत अगस्तींनी ते घेण्याचा रामाला आग्रह केला. राजा हा इंद्र, वरुण, कुबेर, यम यांचा अंश असून तो प्रजेचा उद्धार करतो. आपलाही उद्धार व्हावा म्हणून हे आभूषण तू घ्यावंस, असे अगस्तींनी श्रीरामांना सांगितल्यावर रामाने त्याचा नम्रतेने स्वीकार केला.

« PreviousChapter ListNext »