Bookstruck

उषा-अनिरुद्ध विवाह

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

उषा ही बलीचा पुत्र बाणासुर याची कन्या होय. बाणासुर महान शिवभक्त होता. त्याने शंकराकडून आपणास एक सहस्र हात असावेत, असा वर मागून घेतला. बाणासुर नंतरही नित्यनेमाने शिवपूजा करीत असे. त्यानंतर पुन्हा शंकर प्रसन्न झाले असता बाणासुर शंकराला म्हणाला, "देवा, लवकरच एखादा युद्धप्रसंग येऊन त्यात माझे हे सहस्र हात तुटून पडावेत.'' ही विचित्र मागणी ऐकून शिवासही खेद वाटला. पण ते म्हणाले, "तुझी इच्छा पुरी करणे भाग आहे. उषेच्या नवर्‍याबरोबर तुझे युद्ध होऊन तुझे सहस्र हात तुटतील.'' आता त्यालाही आपल्या मागण्याचा पश्‍चात्ताप होऊ लागला. त्यामुळे उषेला आजन्म अविवाहित ठेवावे, असे ठरवून त्याने तिला एका महालात डांबून ठेवली.
उषा ही शिवपार्वतीची निस्सीम भक्त होती. उषेचे दुःख जाणून पार्वतीने तिला सांगितले, "येत्या द्वादशीला पहाटे स्वप्नात भेटणार्‍या तरुणाबरोबर तुझा विवाह होईल.'' त्याप्रमाणे उषेला तिचा भावी पती स्वप्नात दिसला, पण त्याचे नावगाव, ठिकाण मात्र तिला माहिती नव्हते. तिची हुशार सखी चित्ररेखा हिने अनेक चित्रे काढून दाखवून स्वप्नात भेटलेल्या प्रियकराचा ठावठिकाणा शोधण्यासाठी उषेला मदत करण्याचे आश्‍वासन दिले. होता होता उषेच्या स्वप्नातील तरुण म्हणजे, श्रीकृष्णाचा नातू, मदनाचा मुलगा यादववीर अनिरुद्ध असल्याचे दोघींना कळले. इकडे अनिरुद्धलाही त्याच दिवशी स्वप्नात उषेचे दर्शन होऊन तोही व्याकूळ झाला होता.
चित्ररेखा द्वारकेस जाऊन अनिरुद्धला भेटली व युक्तीप्रयुक्तीने तिने त्याला उषेच्या महालात आणून गुपचूपणे त्यांचा गांधर्व विवाह लावून दिला. काही दिवसांनी ही गोष्ट बाणासुराला कळाली. संतप्त होऊन त्याने आपले सैन्य उषेच्या महालात पाठवले. अनिरुद्धाने अतुल पराक्रम गाजवून त्यांचा समाचार घेतला. शेवटी बाणासुर स्वतःच अनिरुद्धावर चाल करून गेला. पण इकडे नारदांनी ही वार्ता द्वारकेस पोचवली होती. श्रीकृष्ण बलराम, प्रद्युम्न व सैन्यासह बाणासुराच्या नगरीस पोचले. श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राने बाणासुराचे सहस्र हात तुटून पडले. बाणाने वर मागून घेतल्याप्रमाणे घडल्यावर त्याचा भ्रम दूर झाला व तो श्रीकृष्णाला शरण गेला. नंतर श्रीकृष्णाच्याच सांगण्यावरून तो कैलास पर्वतावर शिवाची सेवा करण्यासाठी निघून गेला. इकडे श्रीकृष्णाने शोषितापुरात म्हणजेच बाणासुराच्या नगरीत उषा व अनिरुद्ध यांचा थाटामाटाने विवाह करून दिला व सर्वांसह ते द्वारकेस निघाले.

« PreviousChapter ListNext »