Bookstruck

पारिजात कथा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दक्षप्रजापतीने आपल्या तेरा कन्या कश्‍यप ऋषींना दिल्या. अदिती ही सर्वांत मोठी. एकदा कश्‍यप सिंहासनावर बसून होमहवन करीत असता सिद्धीमंत्र म्हणून त्यांनी होमकुंडात आहुती टाकली. त्याबरोबर होमकुंडातून एक वृक्ष निघाला. तोच पारिजातक होय. पुढे अदितीला इंद्र हा मुलगा झाला. त्याला जेव्हा कश्‍यपांनी अमरावतीचे राज्य दिले तेव्हाच तो प्राजक्त वृक्षही दिला. तेव्हापासून तो वृक्ष अमरावतीस होता.
एकदा कैलास पर्वतावर पार्वती शंकराला म्हणाली,"तुम्ही एवढे सामर्थ्यवान परमेश्‍वर, तो कश्‍यप ऋषी एक यःकश्‍चित मनुष्य. असे असताना त्याने रंग, रूप, सुगंधयुक्त असा अपूर्व पारिजातक निर्माण केला आणि आता तो इंद्राच्या अमरावतीस आहे. मला तो एकदा बघायचा आहे." हे ऐकून लगेच शंकराने पार्वतीला कैलासाच्या एका भागावर आणले. तेथे गेल्यावर पार्वतीला असे दिसले, की तिथे एक अतिशय विस्तीर्ण व सुंदर बाग असून, त्याच्या कुंपणावर पारिजातक वृक्ष लावले होते. प्रत्यक्ष बागेत तर कल्पवृक्ष आणि इतर अनेक सुंदर, सुगंधी फुलांचे वृक्ष होते. आणखी बर्‍याच रमणीय गोष्टी, सुंदर प्रासाद, त्याभोवती सुंदर पुतळे होते. हे सर्व वैभव खुद्द शंकरांच्या मालकीचे होते. शंकरांनी पार्वतीला त्या महालात नेले, त्याच्या वरच्या मजल्यावरील मनोर्‍यातून पार्वतीने आजूबाजूला पाहिले. ते सर्व अपूर्व, सुंदर दृश्‍य पाहून पार्वती फारच प्रभावित झाली; तसेच ज्या पारिजातकासाठी आपण कश्‍यपाची प्रशंसा केली तसे हजारो पारिजातक वृक्ष त्याभोवती कुंपणासारखे होते. संपूर्ण विश्‍व निर्माण करण्याची ज्याची योग्यता तो प्रत्यक्ष महेश्‍वर आपला पती असताना आपण एखाद्या सामान्य स्त्रीप्रमाणे पारिजातक पाहण्यासाठी अमरावतीस जाण्याची इच्छा धरली, याबद्दल तिला फार पश्‍चात्ताप झाला. आपल्या पतीचा मोठेपणा आपण जाणला नाही, या जाणिवेने तिने शंकराची क्षमा मागितली.

« PreviousChapter ListNext »