Bookstruck

कान्यकुब्ज नगरीची कथा

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

विश्‍वामित्र ऋषी रामलक्ष्मणांना बरोबर घेऊन जात असता राजा जनकाच्या दूताने त्यांना सीतेच्या स्वयंवराचे निमंत्रण दिले. विश्‍वामित्रांनी रामलक्ष्मणांनाही बरोबर चलण्यास सांगितले. मग विश्‍वामित्र हिमालयाच्या उजवीकडून गंगेच्या उत्तर तीरावर आले. ते म्हणाले, "रामा, पूर्वी येथे कुश नावाचा राजा होता. त्याला कुशांब, कुशनाभ, अमृतरजस व वसु अशी चार मुले होती. त्यापैकी कुशनाभाने महोदय नावाची नगरी वसवली. पण या महोदय नगरीचे नाव कान्यकुब्ज असे झाले आहे. त्याची कथा अशी - कुशनाभाला शंभर कन्या होत्या. त्या तरुण झाल्यावर एकदा बागेत फिरण्यासाठी गेल्या असता मलयगिरीवर राहणारा वायू रूप बदलून तेथे आला व त्या कन्यांना तुम्ही माझा स्वीकार करा, असे म्हणू लागला. पण पित्याच्या अनुमतीशिवाय आम्ही हे करणार नाही, असे कन्यांनी सांगितले. तेव्हा रागाने वायूने त्यांना शाप देऊन कुरूप केले. मग सर्व मुलींनी नगरात जाऊन वडिलांना सर्व सांगितले. राजाला त्यांचे ते विद्रूप झालेले शरीर पाहून वाईट वाटले.

चूली नावाच्या तपस्व्याला एका गंधर्वकन्येपासून एक त्याच्यासारखाच तपस्वी पुत्र झाला. त्याचे नाव ब्रह्मदत्त ठेवण्यात आले. एके दिवशी ब्रह्मदत्त कुशनाभ राजाकडे आला व तुझ्या शंभर मुली मला दे, म्हणू लागला. या कुरूप मुलींचा कुणीतरी स्वीकार करीत आहे याचा राजाला फार आनंद झाला. त्याने समारंभपूर्वक त्या मुली ब्रह्मदत्ताला अर्पण केल्या. ब्रह्मदत्ताने आपल्या मंत्रशक्तीने त्या मुलींना पूर्वीप्रमाणे तरुण व सुंदर केले. त्यांच्यासह तो आनंदाने राहू लागला. त्या कन्या वायूच्या शापामुळे कुब्जा म्हणजे कुरूप झाल्या म्हणून त्या नगराला कान्यकुब्ज असे नाव पडले. त्या मुली पुढे पुन्हा सुंदर होऊनही त्या गावाचे नाव तेच राहिले. पुढे ते नगर कुशनाभाने आपल्या गाधी नावाच्या मुलाला दिले व आपण वनात निघून गेला. या गाधीने संपूर्ण मगध देश जिंकून राज्य केले. विश्‍वामित्र ऋषी म्हणजे या गाधीराजाचे सुपुत्र होत.

« PreviousChapter ListNext »