Bookstruck

संग्रह ३

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

दळन दळीते गाऊं मी कोनाकोना

जल्म दिलेल्या दोघाजणा

दळन दळीते, ह्रदं मी केलं रितं

आपुली बाबाबया, गाईली उभईतं

पहिली ओवी गाते, बाप्पाजी चातुराला

बापबयाचं नाव घेतां शीन मनाचा उतरला

पहिली ओवी गाते, बाप्पाजी गवळ्याला

गाते बयाच्या जिव्हाळ्याला

पहिली ओवी गाते बाप्पाजी गुजराला

बया तुळस शेजाराला

पहिली माझी ओवी पित्या हौशाला गाईली

माता तुळस र्‍हाईली

सकाळच्या पारी रामधर्माची वेळ झाली

जन्म दिलेल्या बाबाबया, ह्रदयाची ओवी आली

पहिली ओवी गाते बापबयाला सहज

दोघांनी मला रजाची केली गज

सांगावा सांगते आल्यागेल्याला भेटुनी

माझं मायबाप, झालं लईंदी भेटुनी

१०

बाप समिंदर बया माझी गोदायण

काशीला जाते वाट, दोनीच्या मधयानं

११

बापजी बयाबाई, दोन्ही हाईती वड जाई

त्येंच्या साऊलीची किती सांगु बडजाई

१२

पड पड पाऊसा, झड येतीया वार्‍याची

बापजी बयाबाई, माझी पासुडी निवार्‍याची

१३

बापजी बयाबाई दोन अमृताची कुंड

त्यात जल्मला माझा पिंड

१४

चंदन मलयगिरी नांव माझ्या बापाजीचं

माऊलीबाईचं दूध गोड नारळीचं

१५

गावाला गावकुसूं, पानमळ्याला पायरी

आईबाप असताना, नगरी भरली दुहेरी

१६

बापजी बयाबाई दोन दवण्याची रोपं

त्येच्या साऊलीला मला लागली गाढ झोप

१७

माह्याराला जाते उंच पाऊल माझी पडे

बाबाबया, गंगासागर येती पुढे

१८

माझा सांगावा सांग जासूदा जातांजातां

सोप्याला माझा पिता, परसुदारी माता

१९

आईबापाला इच्यारते, कसा परदेस कंठावा

अमृत म्हनवुनी, पेला इखाचा घोटावा

२०

आईबापाला इच्यारते कसं दीस कंठाव एकटीनं ?

बाप म्हनीतो, अपुल्या भरताराच्या संगतीनं

२१

आईबाप बोले लेकी नांदुन कर नांवु

चारचौघामंदी खाली बघाया नको लावु

२२

बापजी इसवर, बया माझी पारवती

बंधुराय गनपती

२३

माझा ग पिंड बापाच्या दंडभुजा

माऊलीबाई तोंडावळा तुझा

२४

माऊली घाली न्हाऊ पिता घालीतो सावली

आपुली कष्टकाया केली लोकाच्या हवाली

२५

आई म्हनु आई, तोंडाला येते लई

काटा मोडता पाई, हुते सई

« PreviousChapter ListNext »