Bookstruck

संग्रह १०

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

१००

अंगुळीला पानी ठेवीते ठोकयाचा

शीण काढिते सखयाचा

१०१

कुस्तीच्या फडावर मोठयामोठयाची खाली मान

विडा उचलितो माझा पैलवान

१०२

सोनसळे गहु ओलवते रवारवा

पैलवानाला माझ्या मेवा

१०३

अंगात अंगरखं छाती उघडी दिसते

ज्वानी कवळी वारा पिते

१०४

दुरून ओळखते सखयाचा काळा कोट

भरज्वानीचा अंगलोट

१०५

अंगात अंगरख, छाती कशानं ओली झाली

माझ्या पैलवानानं कुस्ती केली

१०६

माझ्या घरी पैलवान चारी खेडयाला माहीत

दंडी सोन्याचं ताईत

१०७

माझ्या घरी पैलवान, चारी खेडयात नावाजला

शेला जरीचा देऊं केला

१०८

माझ्या घरी पैलवान गावोगावीच्या आल्या चिठ्ठ्या

माझ्या राजसाला करती हौसेनं दंडपेटया

१०९

माझ्या दरावरनं कोण गेला गोरापान

राजस माझा कंथ, आकडी दुधाचा पैलवान

११०

माझे दृष्टीडोळे निवाले शेजीबाई

घरधनियंनी भरल्या गोणीला दिली बाही

१११

जीवाला माझ्या जड, उसं तुमच्या मांडीवर

तांबडया मंदीलाची छाया पडूद्या तोंडावर

११२

जीवाला जडभारी, तुला कळालं मळ्यामंदी

आसूडशी मोटा, शिवळा बैलाच्या गळ्यामंदी

११३

जीवाला माझ्या जड, शिररंगा माझ्या सांगा

म्होरं गाडी, मागं टांगा

११४

जीवाला माझ्या जड सांगा सख्याला जाऊन

आला कंदील लावून

११५

जीवला माझ्या जड, तुला कळालं माळटेकी

हाती रूमाल धूम ठोकी

११६

जीवाला जडभारी, तुला कळालं वाडयामंदी

वाळू रुतली जोडयामंदी

११७

जीवाला माझ्या जड, डोक दुखंत केसामंदी

सखा राहिला दूर, गाडीबैल देशामंदी

११८

जीवाला माझ्या जड डोकं दुखतं भांगपट्टी

राजस सखा, वैद्याला धाडी चिठ्ठी

११९

सासू मालनीचा कुसबा निर्मळ

राजविलासी शेजेला फुलाचा दरवळ

« PreviousChapter List