Bookstruck

संग्रह ६

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter List

१२६

भरली कृस्नाबाई पानी लागलं ओताला

सोन्याचं कडं माझ्या राघूच्या हाताला

१२७

तांबोळीनबाई पानं देई वीसतीस

बाळराय घोडीवर गनीस

१२८

तांबोळीनबाई पानं देई अणीदार

बाळराय घोडीवर जमींदार

१२९

मुंबईची मुंबादेवी, तुला सोन्याचं कमळ

तुझीया नगरी, माझ्या राघुला संभाळ

१३०

लोकाला लई लेक, माझा एकला शिरहरी

जहाजाला लावी दोरी

१३१

लावणीचा आंबा, पानी घालते वाटीवाटी

साउलीची आशा मोठी

१३२

धनसंपतेचा कोन करीतं हेवादावा

माझा बाळराय मालाचा गुंड नवा

१३३

दोन माझी बाळं, दोन माझे वाडे

लाडक्या लेकीचं करा माहेर मागेपुढे

१३४

दोन माझी बाळं, दंडीच्या दोन येळा

बया ठेवणीची चंद्रकळा

१३५

नागिनी पदमीनी पसरू नकां वाटंतिठं

माझा बाळराय येतुया अवशीपहांटं

१३६

लक्ष्मीआई आली दारला देते धका

जागं व्हाव जेठं लेका

१३७

थोरला माझा लेक वाड्याच्या बुरूज

त्याच्या जीवावरी न्हाई कुनाची गरज

१३८

हौस मला मोठी स्वैपाकामंदी हंडा

ताईत बाळराज सर्व्या संसारामंदी झेंडा

« PreviousChapter List