Bookstruck

लावणी ११ वी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
मला पतिपुरुषोत्तमा ! असावी अपराधाची क्षमा ॥धृ०॥
तुम्ही गुलाब, मी काटेशेवंती समसमान शोभले ।
कंठीची पानडी मी तुमच्या गळ्यामध्यें लोंबले ।
कृपाउदर विस्तीर्ण आपल्या पदरात झोंबले ।
अघटित फळ आलें हाता, आतां मज पाहावें गरिबाकडे
मशिं बोलावें रुबरू, नका धरुं मनामधें वाकडें
प्रीतीचा योग हा कसा ? जसा रविउदय दक्षिणेकडे
जशी ती पडे गांठ रेशमा ॥१॥
मीं मुळची अज्ञान, काय तरि बोलूं थोरापशीं ।
मेरूवर मक्षिका येकटी जड वाटावी कशी ? ।
मधुसाखर लागतां तिथें स्थिर झाले मुंगी जशी ।
भावार्थाने जीव दिला, आपला मानपान राखते
सोसुन अवघी कुणकुण, तुमचे मी दुर्गुण झांकिते
एकांतामधिं अहोरात्र अंगावर हातपाय टाकिते
चरण चेपिते, हरविते श्रमा ॥२॥
समय पाहुन गांठिते, कां हो हरि भाषण केलें मना? ।
निराधार चालून आल्याच्या पुरवाव्या कामना ।
न टळे बळी सत्वास, दान भूमी दिधली वामना ।
कृतिनिश्चय माझा पाईं, नाहीं कुचराई केली कधीं
हिंडन बारा ज्योतिर्लिंगें तुमच्या मागें आपल्या पदीं
नाहीं संशय ठेविला, चक्क शिवते देवाची उदी
प्रीतिला जुदी नसे उपमा ॥३॥
स्वाती घन तुम्ही, त्यांत जिवलगा मी सौदामिनी नभीं ।
काळे रात्रीं जेव्हां गरज लागते तेव्हां मी उभी ।
महा संकटीं धीर करिन, कांहि किंचित मन माझें न भी ।
नाना परिचीं साधनें करून तुम्ही अधीं माया लाविली
अगम्य प्रीतिच्या कळा सकळही कळसूत्रें दाविलीं
होनाजी बाळा म्हणे, सखे तुला करुं प्राणाची साउली
बरी जाहली गडे खातरमा ॥४॥

« PreviousChapter ListNext »