Bookstruck

हिमालयाची शिखरे 10

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

महात्मा ज्यातिबा फुले

१८९० च्या नोव्हेंबरच्या २७ तारखेला एक महान् तेजस्वी तारा भारतीय नभोमंडळांतून अस्तंगत झाला. एक दिव्यतेज अंतर्धान पावलें.

परंतु तें अंतर्धान पावलें नाहीं. तें तेज अधिकाधिक दिव्यभव्य होत गेलें.
म. ज्योतिबांनी दिलेला संदेश चिरंजीव आहे. जोंवर या जगांत विषमता, अन्याय, दुष्ट रुढी आहेत तोंवर त्यांचा संदेश स्फूर्ति देत राहील.

मुलींची शाळा काढणारा, हरिजनांसाठी हौद खुला करणारा, काँग्रेसच्या दारांत शेतक-याचा पुतळा उभा करणारा, डयूक ऑफ विंडसर आले तर त्यांना शेतकरी पोषाखांत जाऊन भेटणारा, दगडधोंडे, शिव्याशाप, अपमान सारें विष शंकराप्रमाणें पचवून दरिद्री नारायणासाठीं उभा राहणारा असा हा धीरोदात्त पुरुष होता.
सत्यशोधक चळवळ त्यांनी सुरु केली. धर्मांतील आत्मा ओळखायला त्यांनी सांगितलें. गुलामगिरीवर तेजस्वी पुस्तक लिहिलें. एक तेजस्वी जागृति त्यांनी निर्माण केली. ज्या काळांत त्यांनी ही थोर कामगिरी केली, त्या काळाकडे पाहता ज्यातिबांच्या धीरोदात्ततेबद्दल आश्चर्य वाटते.

त्यांनी रुढींवर कोरडे ओढले, स्वत:ला श्रेष्ठ मानणा-या जातींवर प्रहार केले. परंतु हें सारें समताधर्म यावा म्हणून. लोकमान्य नि आगरकर डोंगरीच्या तुरुंगांतून सुटले तर त्यांचें स्वागत करायला म. ज्योतिबा सर्वांच्या पुढे.

कै. शाहू छत्रपतींचीं एक गोष्ट. लोकमान्य आजारी असतांना छत्रपतींनी तार पाठविली,  “ माझा बंगला तुमच्यासाठीं आहे. प्रकृति स्वास्थ्यासाठीं यावें. प्रकृति सुधारो.”

थोरांच्या हृदयांत बाहय भेदांखाली एक अतूट अशी मानवता व दिलदारी असते. म. ज्योतिबांच्या पुण्यस्मृतीस शतश: प्रणाम ! त्यांचा हा प्रिय महाराष्ट्र, प्रिय भारत थोर होवो व सत्याची उपासना करो.

« PreviousChapter ListNext »