Bookstruck

हिमालयाची शिखरे 12

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

कॅप्टन लक्ष्मी उभी राहिली. “ महात्माजी , हे राष्ट्रतात, आशीर्वाद द्या, ” नेताजी म्हणाले, “ चलो दिल्ली. भारतमाता हांक मारीत आहे. ते डोंगर, त्या नद्या बोलावीत आहेत. चला. पडलों तर भारताकडे जाणा-या रस्त्याचें चुंबन घेऊन आनंदानें मरुं.”  दिव्य वाणी हिंदु-मुसलमान-शीख सारे एक. नव भारत जन्मले. हिंदी फौज निघाली. रंगून घेतलें गेलें. तिथल्या बहादूरशहाच्या कबरेस नेताजींनीं प्रणाम केला. परंतु देशांतील चलेजाव लढाहि थांबला होता. आणि अ‍ॅटम बाँबने जपान पडलें. आझाद हिंद फौज गवत खाऊन लढत होती. बैलगाडयांतून रणगाडयांशी झुंजत होती. परंतु आता उपाय नव्हता. नेताजींचे डोळे भरुन आले, “तुम्ही महात्माजींकडे जा. मी देशासाठी जातों.”

ते विमानांत चढले. परंतु त्या विमानानें त्यांना देवाघरीं नेलें. त्यांची शेवटची भेट, रिस्टवॉच, जवाहरलालकडे आली. ती त्यांनीं शरदबाबूंना दिली. आझाद सैनिक गिरफ्तार झाले. अनेकांना गोळया घालण्यांत आल्या.

परंतु काँग्रेसनें उंच आवाज केला. स्वर्गीय भुलाभाई उभे राहिले. “ गुलाम राष्ट्राला बंडाचा अधिकार आहे ” ते म्हणाले. पंडीतजींनी जयहिंद मंत्र राष्ट्राचा केला. नेताजी हृदया-हृदयांत अमर झाले.

केवढे धगधगीत जीवन ! ते एकदां म्हणाले, “ माझ्या लग्नाचा विचार मला कधी शिवला नाहीं. भारतमातेचे स्वातंत्र्याशी लग्न कधी लावीन हाच विचार मनांत असतो.” त्यांच्या रोमरोमांत भारतीय स्वातंत्र्याची उत्कटता होती. नेताजी, आम्ही धन्य, आम्ही तुम्हांस पाहिलें, तुमची वाणी ऐकली, शून्यातून विश्व निघण्याचें महान अद्वितीय कर्तृत्व पाहिले ! भारतीय स्वातंत्र्य आणण्यांत तुमचा केवढा हिस्सा ! प्रणाम, प्रणाम तुम्हाला ! तुमचें जीवन आम्हांला जातीय विषापासून मुक्त करो, देशसेवेचे वेड लावो.

« PreviousChapter ListNext »