Bookstruck

संकटाची चाहूल ५

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
त्या अंधाऱ्या जागेतून फिरताना त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी तिथे असण्याचा त्याला आभास झाला. म्हणून त्याने आपल्या दिव्य दृष्टीच्या सहाय्याने, तिथे त्याच्या व्यतिरिक्त खरोखरच कोणी असण्याची शक्यता पडताळून पहिली. आणि खरोखरच त्याची शंका ठरली. त्याला झालेला आभास खरा होता. त्याच्यासमोर ती उभी होती. परंतू आत्म्याच्या स्वरुपात. तिचे शरीर कुठे आहे? काय, ते नाश पावले असावे? म्हणजे हिचा मृत्यु झाला आहे तर.... परंतू जर असे असेल तर मग हिला अजुनही मुक्ती का मिळत नाही? असे कितीतरी प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले. क्षणार्धात ती त्याच्या जवळ येऊन उभी राहिली.

"बरं झालं आज पुन्हा भेटलीस. तु आहेस तरी कोण? आणि अशी सारखी सारखी माझ्याच समोर का येतेस." प्रकाश उदगारला.

"मला ओळखलं नाहीस तू." ती म्हणाली.

"नाही, म्हणुनच तर विचारतोय ना?"

"म्हणजे तुला काहीच आठवत नाहीये तर”

"नाही. मला तुझ्याबद्दल तरी काहीच आठवत नाहीये. आणि आठवायला तुझा आणि माझा संबंध तरी काय?"

"वा... ही तर कमालच झाली."

"म्हणजे काय बोलायचे आहे तुला? तू आहेस तरी कोण?"

"तू मला विसरला असशील पण मी नाही ना विसरू शकत."

"अगं हे काय बोलत आहेस तू. मला काहीच कळत नाहीये."

"कळेल मग, कधीतरी... मी स्वतःहून तुला काहीच सांगणार नाहीये."

"अगं पण..." तितक्यात ती तिथुन दिसेनाशी झाली.

"पुन्हा काहीही न सांगताच, अशीच निघून गेली." तो स्वतःशीच म्हणाला. तितक्यातच ती पुन्हा त्याच्या समोर आली. परंतु आता ती खूपच भयावह दिसत होती. तिचे संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले होते. आणि चेहऱ्यावर जागोजागी जखमा दिसत होत्या. तो तिच्याशी काही बोलणार तितक्यातच ती पुन्हा तिथुन नाहीशी झाली. तसा तो घामाघूम होऊन खडकन बिछान्यावर उठून बसला. फूsss....स्वप्न होते ते! ह्या विचित्र स्वप्नाचा काय अर्थ असावा? याच विचारात तो पुन्हा हरवला.
« PreviousChapter ListNext »