Bookstruck

विकासाची रहस्ये ३

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
आपल्या कामासाठी घराबाहेर गेलेला प्रकाश घरी आला तेव्हा त्याला विक्षर स्वतःमध्येच हरवून कसला तरी विचार करताना दिसला. त्यावेळी तो इतका विचारमग्न झाला होता की, त्याला प्रकाशच्या येण्याची चाहूलही लागली नव्हती. आणि लागली तरी कशी असती? कारण आतापर्यंत तर प्रकाशच्या रूपातील भद्र त्याच्याबरोबरच होता. स्वतःमध्येच हरवून विचारमग्न झालेला विक्षर त्याला अस्वस्थ वाटत होता. त्यामुळे न राहवून त्याने विक्षरला त्यामागचे कारण विचारले. त्यावेळी त्याला विक्षरने 'तुम्ही सांगितलेल्या गोष्टींचाच विचार करत आहे.' म्हणून सांगितले, तसा प्रकाश थोडासा गोंधळला.

"अरे पण मी कधी तुला काय सांगितले? मी तर आताच घरी आलो आहे." प्रकाश म्हणाला.

"मी इतकाही लहान नाही बाबा की, आता तुम्ही अशाप्रकारे माझी मस्करी कराल."

"अरे मी कशाला मस्करी करेन? मी खरंच आताच इथे आलोय."

"हो का? मग मगापासून इतका वेळ मला त्या रहस्यमयी गोष्टी कोण सांगत होतं?"

"कुठल्या रहस्यमय गोष्टी?" प्रकाशने आश्चर्याने विचारले.

"त्याचं... नागांच्या, देवतांच्या, भुतांच्या..."

विक्षरचे बोलणे ऐकून प्रकाशने त्याच्या अनुपस्थितीत घडलेल्या प्रकारचा आपल्या आंतर्ज्ञानाच्या दिव्य दृष्टीने आढावा घेतला. तेव्हा त्याला सर्व प्रकार माहित पडला. भद्रने त्याच्या अनुपस्थितीत केलेल्या कृत्यामुळे तो थोडासा सतर्क मात्र नक्कीच झाला होता. काहीही झाले तरी त्याला विक्षरपासून सत्य लपवायचे होते. म्हणून त्याने "मी मघाशी पण मस्करीच करत होतो तुझ्याशी, मी तुला मगाशी जे काही सांगितले ते सर्व खोटे होते." असे म्हणून तो मोठमोठ्याने हसू लागला. त्याचे असे हसणे पाहून विक्षर पूर्णपणे गोंधळून गेला. प्रकाशचे कुठले बोलणे खरे हेच त्याला समजत नव्हते. परंतु प्रकाशच्या अशा बोलण्यामुळे भद्रने प्रकाशच्या रुपात येऊन विक्षरला ज्या काही गोष्टी सांगितल्या होत्या त्या खोट्याही असाव्यात, असे त्याला वाटू लागले. तरीही भद्रने केलेल्या या कृत्यामुळे प्रकाश आता चांगलाच सावध झाला होता. म्हणून त्याला आता भद्र आणि विक्षरवरही नीट लक्ष ठेवावे लागणार होते. विक्षर आणि भद्रची कुठल्याही परिस्थितीत भेट होणे त्याला टाळायचे होते.
« PreviousChapter ListNext »