Bookstruck

सत्यातील असत्यता १

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
फोनची रिंग वाजत होती. घरात प्रकाशशिवाय दुसरे कोणीही नव्हते. लगेचच त्याने फोन उचलला. त्याच्या शैला काकीचा फोन होता. त्याला तसा महिन्या सहा महिन्यातून त्यांचा फोन येत असे. पण आज त्यांचा फोन येण्यामागचे कारण थोडे गंभीर होते. फोनवरून प्रकाशचे संदीप काका खूप आजारी असून ते आता शेवटच्या घटका मोजत असल्याचे त्याला कळले. ते ऐकून प्रकाश थोडासा चिंतीत झाला. त्याच्या मनात साठवलेल्या त्याच्या काकांच्या स्मृती त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागल्या. त्याचे संपूर्ण जीवन बदलवून टाकणारी त्याच्या अपहरणाची रात्र त्याला आठवली. पोलिसांनी तो सापडल्याची माहिती कळवताच तो क्षणाचाही विलंब न करता त्याला तिथून घरी घेऊन जायला आला होता. किती जीव होता त्यांचा प्रकाशवर, हे सगळं चित्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले.

मनात आणले असते तर प्रकाश त्यांचा जीव वाचवू शकत होता. परंतु वसंतच्या वेळी सुद्धा त्याने तसे केले नव्हते. स्वतःच्या स्वार्थाकरिता निसर्ग नियमांच्या विरुद्ध कार्य करणे त्याला आजही मान्य नव्हते. तरीही, सुख-दुःख मोह माया, यांच्या पलीकडे गेलेला प्रकाश नाही म्हटले तरी आज थोडासा अस्वस्थ नक्कीच झाला होता. तो फोन आल्यापासून त्याच्याच विचारात तो हरवून गेला होता. बऱ्याच वेळाने तो त्याच्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. त्याने घड्याळाकडे बघितले. संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. अचानक आलेल्या फोनमुळे आणि त्यामुळे त्याच्या मनावर झालेल्या परिणामामुळे, त्याला विक्षरला शाळेतून आणायला खूप उशीर झाला आहे, हे त्याच्या लक्षात येताच तो विक्षरला शाळेतून घरी आणण्याकरिता ताडकन घराबाहेर पडला.
« PreviousChapter ListNext »