पूर्वपुराणाश्मयुग
याचा काळ सामान्यपणे पाच लाख ते दीड लाख वर्षांपूर्वीपर्यंतचा समजण्यात येतो. काही भूप्रदेशांत दहा हजार वर्षांपूर्वीपर्यंत हीच सांस्कृतिक अवस्था चालू होती. या काळात ग्युंझचा (पहिल्या हिमयुगाचा) आरंभ, येथपासून ते रिसच्या (तिसऱ्या हिमयुगाच्या) पहिल्या चरणापर्यंतचा भूस्तरीय काळ समाविष्ट होतो. अत्यंत कडाक्याची थंडी आणि तीव्र उष्णता असे विषम हवामान आणि तेही वारंवार बदलणारे, त्यामुळे पृथ्वीवरील वनस्पतिजीवनात मोठे फेरफार होत गेले. वृक्षराजी, दाट जंगले व गवताळ प्रदेश यांचे पट्टे उत्तर-दक्षिण असे सरकत राहिले. त्यामुळे जीवसृष्टीही बदलत गेली. आता नष्ट झालेले, सरळ दातांचे भीमगज व तत्सम इतर प्राणी, तसेच पाणघोडे, गेंडे, अस्वले, गवे, सांबरे, घोडे, हरणे असे कितीतरी प्राणी मानवाच्या अवतीभोवती वावरत होते. या प्राण्यांची शिकार हेच प्रमुख उपजीविकेचे साधन होते.