ग्राम संकल्पना
आंतराश्मयुगात काही ठिकाणी पाचसात घरांचे समूह दिसले, तरी त्या वेळी ग्राम या कल्पनेचा जन्म झाला नव्हता. नवाश्मयुगात बरीच माणसे कायमची एका ठिकाणी राहणार, म्हणजे बरीच घरे एकमेकांशेजारी बांधली जाणार, असे झाल्यावर या सहवासाचा अर्थ व त्यातील प्रश्न समजावयास लागले. या माणसांना ये-जा करण्यास मार्ग हवेत, म्हणजे रस्ते हवेत. नवाश्मयुगातील बर्याच मोठ्या कालखंडात रस्ता ही कल्पना ज्ञात नव्हती.