Bookstruck

ग्रीक मूर्तीविज्ञान

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »
ग्रीसमधील प्राचीनतम शिल्पे साधारणतः इ. स. पू. आठव्या शतकापासून आढळतात. देवतांना नवसफेडीप्रीत्यर्थ वस्तू अर्पण करतानाचे प्रसंग, विजयोत्सव, थोर पुरुषांचे सन्मान इ. प्रसंगांचे प्रकटीकरण शिल्पांतून झाल्याचे दिसून येते. ही शिल्पे दगड संगमरवर, चुनखडी, सिलखडी; धातू सोने, चांदी, ब्राँझ, शिसे व लोखंड; लाकूड, हस्तिदंत, पक्वमृदा इ. माध्यमांतून घडविलेली आढळतात.आदर्श मानवी सौंदर्याचे मानदंड ठरतील अशा स्त्री-पुरुषांच्या मूर्ती व उत्थित शिल्पे निर्माण करुन ग्रीकांनी आपल्यादेवदेवताप्रतिमा साकार केल्या. कित्येकदा त्यांना प्रतीकांचीजोड दिली. उदा., अथीना ही युद्धदेवता शिरस्त्राणासह; तर अपोलो ही कलादेवता वीणेसह दर्शवीत.



ग्रीक प्रतिमांवर भौमितिक आकृत्यांचा प्रभाव दिसतो. उभ्या मूर्तीचा डावा पाय किंचित पुढे असे. बैठ्या मूर्ती ताठ व रुंद खांद्यांच्या असत. त्यांचा दर्शनी भागच काय तो पाहण्याच्या दृष्टीने खोदीत. मूर्तीच्या शरीराची ढब पारंपारिक होती. डोक्याचे केस सपाट पण किंचित नागमोडी; डोळे विशाल व करडे भाव दर्शवणारे असे दर्शविण्याची प्रथा होती. अंगावरील वस्त्रे उभ्या समांतर रेषांनी दाखवीत. पुतळे भडक रंगांनी रंगवीत. ह्यात वास्तवता मर्यादित होती. तथापि शरीराचे चलनवलन चैतन्यमय असल्याचा प्रत्यय त्यातून येई. बैठी शिल्पे ठरीव पद्धतीची असत. उत्थित शिल्पेही ठरीव ठशाची असून त्यात जाडी दृग्गोचर होई. अभिजात युगात शरीराच्या अवयवांची ढब तीच राहिली; पण चलनवलनास प्राधान्य आले. आता सर्वांगास दर्शनी रूप येऊ लागले. देव व मानव यांची रूपे ठरीव ठशाची झाली. तरीही त्यात शिल्पविद्येचे ग्रांथिक नियम व शिल्पविषयाचे व्यक्तिमत्त्व यांचा समतोल साधलेला असे. पाषाणाच्या व धातूच्या प्रतिमांत हे विशेषेकरून दिसून येते. पुढील काळात शिल्पे अधिक वास्तव झाली. वस्त्रदर्शक रेषा अधिक खोल झाल्या. शिल्पांत सडपातळपणा आला. शिल्पांची दर्शनीयता व वैविध्य वाढले. शिल्पे रंगवण्याची प्रथा या काळातही चालूच राहिली. ऑलिंपिया येथील झ्यूस- मंदिरातील फिडीयसचा झ्यूस; लॅपिथ्स अँड सेंटॉर्स; मायरनचा डिस्क्‌सथ्रोअर; हर्मीझ; व्हिक्टरी ऑफ सॅमोथ्रेस इ. शिल्पे या संदर्भात उल्लेखनीय आहेत 

« PreviousChapter ListNext »