Bookstruck

गोष्ट बारावी

Share on WhatsApp Share on Telegram
« PreviousChapter ListNext »

गोष्ट बारावी

'जो न ऐके हिताचे बोलणे, त्याच्या नशिबी ठोकरा खाणे !

सागरतीरी टिटवा - टिटवीचे एक जोडपे राहात होते. एकदा टिटवी लाजत मुरकत टिटव्याला म्हणाली, 'ऐकल का ? मला दिवस गेलेत. तेव्हा मला अंडी घालण्याच्या दृष्टीने एखादे सुरक्षित ठिकाण तुम्ही शोधून काढा.'

टिटवा म्हणाला, 'कांते, अगं समुद्रकिनार्‍यासारखं हवेशीर ठिकाण सोडून, अंडी घालण्यासाठी दूरच्या ठिकाणी जाण्याचं काय कारणं ? तू या किनार्‍यालगतच्या पुळणीतच अंडी घाल.'

टिटवी म्हणाली, 'पण पुनवेला या समुद्राला नेहमीपेक्षा अधिक भरती आली आणि याच्या लाटांबरोबर याने माझी अंडी वाहून नेली, तर काय करू ?'

टिटवा हसून म्हणाला, 'प्रिये, तुम्हा बायकांची जात अती भित्री. अगं आपल्या अंड्यांना हात लावण्याची त्या समुद्राची काय बिशाद लागते ?'

त्या टिटव्याचे हे बोलणे ऐकून, त्या समुद्राने मुद्दामच टिटवीने अंडी घातल्यावर ती लांबविण्याचे ठरविले. तो मनात म्हणाला, 'ज्या पुरुषांचे तेज घराबाहेरच्या जगात कुठेच पडत नसते, त्यांणा घरात बायकापोरांसमोर पावलोपावली आपल्या मोठेपणाचे प्रदर्शन करण्याची वाईट खोड असते. तेव्हा निदान या टिटव्याची मिजास उतरविण्यासाठी तरी, या टिटवीची अंडी लांबवायलाच हवीत.'

मग पतीच्या सांगण्यानुसार टिटवीने सागरकिनारीच्या वाळवंटात अंडी घातली, आणि एके दिवशी ती दोघे भक्ष्याच्या शोधार्थ दूरवर गेली असता, समुद्राने पुनवेच्या महाभरतीची संधी साधून, आपल्या लाटांच्या हातांनी ती अंडी लांबविली.

परत आल्यावर जेव्हा आपली अंडी समुद्राने पळवून नेली असल्याचे त्या टिटवीला आढळून आले, तेव्हा आकांत करीत ती टिटव्याला म्हणाली, 'तुम्हाला परोपरीने सांगूनही तुम्ही माझे ऐकले नाही, म्हणून आपल्यावर हा प्रसंग ओढवला. दुसरे लोक हिताचे सांगत असतानाही, जे आपल्याच हेक्यानुसार वागतात, ते काठी सोडल्यामुळे आकाशातून खाली पडून मेलेल्या कासवाप्रमाणे नाश पावतात?'

ती कासवाची गोष्ट काय आहे, 'अशी पृच्छा टिटव्याने केली असता, आपले रडणे तात्पुरते थांबवून टिटवी म्हणाली, 'ऐका-

« PreviousChapter ListNext »